काँग्रेसनेच सांगली काँग्रेसमुक्त केली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:18 PM2019-04-21T17:18:07+5:302019-04-21T17:24:22+5:30
आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून मुक्त भारताचा निर्धार करीत होतो; मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली आहे.
सांगली - आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून मुक्त भारताचा निर्धार करीत होतो; मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली आहे.
महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील स्टेशन चौकात रविवारी सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे नेते गौतम पवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सांगली ही वसंतदादांची भूमी आहे. याठिकाणी काँग्रेसने स्वत:च्या चिन्हावर लढण्याची आवश्यकता असताना, आता वसंतदादांचे नातू स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसन्या तिकिटावर लढत आहेत. उमेदवारी देताना एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात काँग्रेस नेत्यांनी पक्षाची जिरविली. स्वाभिमानी म्हणणाऱ्यांचा स्वाभिमान आता शिल्लक तरी आहे का? शरद पवारांच्या विरोधात शेट्टी यांनी माझ्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. अनेक कारखान्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता ते अशाच भ्रष्टाचारी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्याकडे असलेला स्वाभिमान म्हणजे सदाभाऊ खोत आमच्याकडे आहे. त्यामुळे शेट्टी यांच्याकडे स्वाभिमान शिल्लक राहिलेला नाही.
दादांच्या वारसदारांनीच सर्व संस्था बुडविल्या - संजयकाका पाटील
वसंतदादा पाटील यांच्या नावाने मते मागणाऱ्या त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या नावाच्या संस्थाच बुडविल्या. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने मते मागत आहेत, असा सवाल खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील मारुती चौकात सभा पार पडली. यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले की, वसंतदादा कारखाना चालवायला देऊन अभिमान बाळगणाऱ्या विशाल पाटील यांच्या घरात ११ वेळा खासदारकी मिळाली. पण त्यांनी सांगलीसह जिल्ह्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी काय केले? कोणते प्रश्न मार्गी लावले?
विशाल पाटील हे दादांचा नातू म्हणून मते मागत आहेत. त्यांनी कारखाना चालवायला दिला, पण कामगारांना देशोधडीला लावले. कामगारांचे भविष्य निर्वाह निधीसह अनेक देणी दिलेली नाहीत. कामगारांना टाचा घासून मरण्याची वेळ आली आहे. दुसरीकडील उमेदवार हे जातीच्या आधारावर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा पूर्वइतिहास वेगळा होता, आता ते एमआयएमचे ओवेसी यांच्या नावे लढत आहेत. ओवेसींचा जातीधर्माचा विखारी चेहरा संसदेत अनुभवला आहे. या लोकांची महत्त्वाकांक्षा ही राक्षसी स्वरुपाची आहे.