साध्वींबद्दल भाजपाचे मौन का? - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:18 PM2019-04-21T16:18:31+5:302019-04-21T16:45:21+5:30
साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे.
सांगली - साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देशात लोकशाही धोक्यात येत आहे. एकीकडे मोदी दहशतवाद संपविल्याचे सांगत असतानाच भाजपाकडून दहशतवादाचा आरोप असलेल्या साध्वीसारख्या लोकांना उमेदवारी दिली जाते. ज्या शहीद पोलिसांना अशोकचक्र दिले जाते त्यांच्याबद्दल अपशब्द काढून तमाम देशवासीयांचा अपमान साध्वी ठाकूर आणि भाजपाने केला आहे. साध्वीच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचे छुपे मनसुबे स्पष्टपणे दिसत आहेत.
पाकिस्तानचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देतो, यामागे नेमक्या काय गोष्टी दडल्या आहेत, हे आम्ही सत्तेवर आल्यानंतर उजेडात आणू. भारताचा पंतप्रधान कोण हे सांगणारा इम्रान खान कोण? यापुढे या देशात नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेतली आहे. एअर स्ट्राईक झाला हे आम्ही मान्य करतो, पण त्याबद्दलची चुकीची आणि परस्परविरोधी माहिती भाजपा नेते पसरवित आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी एकही माणूस मारला गेला नाही, असे सांगून खरे बोलल्या. त्यामुळे आम्ही त्यांचे जाहीर आभार मानत आहेत.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांना विस्थापित करणारी ही निवडणूक आहे. या आघाडीतून मी पुन्हा भाजपामध्ये जाणार, अशी अफवा पसरविली जात आहे. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. यापुढे भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचे लोक आगामी विधानसभेच्या उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीकडे येतील. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, प्रा. सुकुमार कांबळे, यशपाल भिंगे, शकील पिरजादे, प्रशांत शेजाळ, ब्रम्हानंद पडळकर, नामदेव करगणे, सचिन माळी आदी उपस्थित होते.