लाडक्या लुसी श्वानाचं डोहाळ जेवण
By admin | Published: May 31, 2017 11:14 PM2017-05-31T23:14:01+5:302017-05-31T23:14:01+5:30
लाडक्या लुसी श्वानाचं डोहाळ जेवण
शंकर पोळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपर्डे हवेली : ‘कोणीतरी येणार-येणार गं, पाहुणा घरी येणार-येणार गं’ हे गाण्याचे बोल कोणा महिलेसाठी नाही तर चक्क ग्रेहाउंड जातीच्या गरोदर श्वान मादीसाठी महिलांनी गायिले. वडोळी निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील परिसरात अनिकेत डुबल या कुटूंबाने त्यांच्या घरी असलेल्या महाराणी ऐक्सप्रेस लुसी नावाच्या श्वान मादीचा अनोखा डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात आला.
वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथे अनिकेत डूबल यांच्या कुटूंबात लुसी नावाची श्वान मादीचे त्यांनी पालन केले आहे. महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्यात येतो, अगदी त्याचप्रमाणे लुसीचा हा डोहाळे जेवण सोहळा साजरा करण्याचा निर्णय कुटूंबियांच्यावतीने घेण्यात आला.
लुसीला डुबल कुटूंबिय आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानतात. घरातील सर्व लोक प्रेमाणे तिच्याबरोबर वागतात.लुसीला परिसरामध्ये ‘महाराणी एक्स्प्रेस-लुसी’या नावाने ओळखले जाते. आजपर्यंत लुसी शर्यतीच्या स्पर्धेत वेगवेगळ्या ठिकाणी सात वेळा विजेतेपदाची मानकरी ठरली आहे.
महिलेच्या डोहाळे जेवणाप्रमाणेच लुसीचा सोहळाही डुबल कुटूंबियांनी यावेळी उत्साहात पार पडला. सोहळ्यावेळी घरातील आणि बाजूच्या परिसरातील महिलांनी गरोदर लुसीची हिरवापीस, नारळ, सुपारी, तांदूळ, हळकुंड आदिंनी ओटी भरली व हळदी कुंकु लावून औक्षण केले, फुलांचा हार घातला व तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ तिला खाऊ घातले. त्यानंतर महिलांचा हळदीकुंकू समारंभ झाला व शेवटी भोजन कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी वडोली निळेश्वर गावच्या सरपंच सुरेखा सुरेश डुबल यांच्यासह कुटुंबातील सदस्य व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
महिलाही हरकल्या...
महाराणी एक्सप्रेस लुसी या श्वानाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम वडोली निळेश्वर मधील महिलांनी आनंद घेतला. गळ्यात, पायात हार घालून हळद कुंकू लावून लुसी सर्वांपुढे बसली होती. समोर होत असलेल्या कार्यक्रमाविषयी तिला काही समजत नसले तरीही आपले कोडकौतुक होत असल्याचे तिला समजत होते. या कार्यक़्रमाने महिलाही हरकल्या.