मडगाव स्फोट, पानसरे हत्या अन् आता नालासोपारा स्फोटकांचेही 'सांगली कनेक्शन'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 03:10 PM2018-08-12T15:10:42+5:302018-08-12T15:13:40+5:30
गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट, कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या आणि दोन दिवसापूर्वी मुंबईतील नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा, या तिन्ही वेगवेगळ्या घटनांचे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे
सांगली : गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट, कोल्हापुरातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या आणि दोन दिवसापूर्वी मुंबईतील नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा, या तिन्ही वेगवेगळ्या घटनांचे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे उघड झाले आहे. या घटनांचा छडा लावण्यासाठी दहशतविरोधी पथक गेल्या आठ वर्षापासून धडपडत आहे. परंतु, मुख्य संशयित रुद्रगौडा पाटीलसह दोघेजण अजूनही फरारी आहेत. त्यामुळे या तिन्ही घटनांचे गूढ कायम आहे.
मडगाव येथे विजयदशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आठ वर्षापूर्वी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला तिथे एका स्कूटरमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात सनातचा साधक मलगोंडा पाटील ठार झाला होता. मलगोंडा हा काराजनगी (ता. जत, जि. सांगली) येथील मूळचा रहिवाशी आहे. त्याने सांगलीत सनातनच्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते. हा तपास ‘एनआयए’कडे (नॅशनल इन्विस्टिगेशन एजन्सी) सोपविण्यात आला होता. या स्फोटाचे ‘कनेक्शन’ प्रथम सांगली निघाले होते. मलगोंडा बॉम्ब लावतानाच स्फोट झाल्याने तो ठार झाल्याचा एनआयएचा संशय आहे. याप्रकरणी मलगोंडाचा चुलत भाऊ रुद्रगौडा पाटील याच्यासह ढालगाव (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील प्रविण लिमकर याचेही नाव निष्पन्न झाले होते. सांगलीच्या गावभागातील काही संशयितांची नावे पुढे आली होती. या सर्वांच्या शोधासाठी एनआयएचे पथक सांगली जिल्ह्यात अनेकदा येऊन गेले आहे. परंतु, अजून एकाचाही सुगावा लागलेला नाही.
कॉ. गोविंदराव पानसरे यांची कोल्हापुरात भरदिवसा हत्या झाली. त्यांच्या हत्येचे ‘कनेक्शन’ही सांगलीच निघाले. हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याचे नाव निष्पन्न झाले. समीर हाही मूळचा सांगलीचा आहे. तो विश्रामबाग येथील मोती चौकात राहतो. त्याला दोन वर्षापूर्वी अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. दोन दिवसापूर्वी दहशतवादविरोधी पथकाने नालासोफरा येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी साताऱ्याच्या सुधन्वा गोंधळेकर याच्यासह तिघांना अटक केली आहे. गोंधळेकर हा सांगलीतील शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे. या शस्त्रसाठ्याचे कनेक्शनही सांगलीपर्यंतच आले आहे. पण, शिवप्रतिष्ठानने गोंधळेकर हा आमचा कार्यकर्ता नसल्याचे म्हटले आहे. सांगली ही शिवप्रतिष्ठानची कर्मभूमी आहे. त्यामुळे या शस्त्रसाठ्याचे मूळ इथेपर्यंत आहे का, याचा उलघडा करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने सांगली पोलिसांशी संपर्क साधला आहे.
जत, कवठेमहांकाळला बॉम्बस्फोटाची चाचणी
मलगोंडा पाटील, रुद्रगौडा पाटील व प्रविण लिमकर या तिघांनी मडगावमध्ये स्फोटापूर्वी जत तालुक्यात निर्जन ठिकाणी बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती, अशी माहिती एनआयएच्या तपासातून पुढे आली होती. त्याअनुषंगाने चौकशीसाठी एनआयएचे पथक जत आणि कवठेमहांकाळला येऊन गेले होते. मलगोंडाच्या नातेवाईकांची पथकाने भेट घेतली. त्यांचे जबाब नोंदवून घेतले. मात्र, नातेवाईकांनी कित्येक वर्षापासून हे तिघे गावाकडे आलेच नसल्याचे सांगितले. सध्या रुद्रागौडा व लिमकर हे ‘वॉन्टेड’ आहेत. एनआयए, दशहतवादविरोधी पथकासह सांगली पोलीस त्यांच्या मागावर आहे.