मुलींच्या अपहरणप्रकरणी सावत्र आईला सक्तमजुरी बांबवडे-शिराळा येथील घटना : आरोपी महिला लातूरची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:43 PM2018-05-05T23:43:47+5:302018-05-05T23:43:47+5:30
इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी
इस्लामपूर : बांबवडे (ता. शिराळा) येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना अमानवी कृत्यासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरत तिला पाच वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
शिक्षा झालेली ही महिला आरोपी लातूर जिल्ह्यातील टाकळी बुद्रुक येथील राहणारी आहे. विद्या रघुनाथ गायकवाड (वय ३६) असे तिचे नाव आहे. या आरोपी महिलेने ८ ते ९ जणांबरोबर लग्न करून संसारही थाटला होता. अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी तिने बांबवडे (ता. शिराळा) येथील मानसिंग हिंदुराव धुमाळ यांच्याशी संसार केला. न्यायालयाने तिला कलम ३६३, ३६६ आणी ३६६ (अ) नुसार प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास तिला आणखी ३ महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी विद्या रघुनाथ गायकवाड हिने अनेक नवºयांना गंडा घातल्यानंतर मानसिंग धुमाळ यांच्याशी लग्न केले. त्यांना पहिल्या पत्नीपासून १६, १४ आणि ११ वर्षे वयाच्या तीन मुली होत्या. विद्या ही या मुलींना सावत्र आई लागत होती. या मुली अल्पवयीन आहेत, हे माहीत असतानाही ती मुलींना ‘तुमचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते’ असे म्हणून फूस लावत होती. ५ एप्रिल २०१७ रोजी विद्या बांबवडे येथील राहत्या घरातून या तीन मुलींना पळवून घेऊन गेली.
त्यानंतर मुलींचे वडील मानसिंग धुमाळ यांनी तिच्याविरुद्ध शिराळा पोलिसांत फिर्याद दिली. विद्या ही या मुलींना घेऊन पोलिसांना चकवा देत तब्बल पावणेदोन महिने फरारी राहिली होती. यादरम्यान या मुलींना हातकणंगले येथील धनगर गल्लीत भाड्याने खोली घेऊन ठेवले होते. तेथे वेगवेगळ्या ग्राहकांना आणून त्या मुलींना दाखवत होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला २७ मे रोजी अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाला हवालदार टी. ए. पवार, चंद्रकांत शितोळे यांनी मदत केली.
दहा साक्षीदार तपासले
अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपी विद्याच्या दोन पूर्व नवºयांनीही साक्ष दिली. फिर्यादी मानसिंग धुमाळ, १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, साक्षीदार यांच्यासह तपास अधिकारी पी. एन. गायखे आणि पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. रणजित पाटील यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी विद्या गायकवाडचे कृत्य हे पूर्वनियोजित आणि हेतूत: केले गेले आहे. तिने अनेकांशी लग्न केले आहे. तिच्यावर कोणीही अवलंबून नाही. त्यामुळे तिच्या हातून पुन्हा असा गुन्हा घडू नये यासाठी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.