Maratha Kranti Morcha सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद, पोलिस आणि नेते आंदोलकांच्या रोषाला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 05:29 PM2018-07-24T17:29:18+5:302018-07-24T17:37:32+5:30
राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे मंगळवारी सांगली जिल्ह्यातही पडसाद उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केले तर काही ठिकाणी पोलिसाना आणि नेत्यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सांगली : राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे मंगळवारी सांगली जिल्ह्यातही पडसाद उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी रॅली, रास्ता रोको, निषेध सभा, निदर्शने करत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केले तर काही ठिकाणी पोलिसाना आणि नेत्यांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आंदोलकांनी रावसाहेब दानवे, सुभाष देशमुख यांची गाडी अडवून आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज भाजपच्या मागे राहणार नाही अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुंडलापूर येथे आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला.
सांगील शहरात नागरिकांनी दैनंदिन सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली लेंगरे येथे एका एस. टी. बसवर दगडफेक झाली तर कवठेमहंकाळ तालुक्यात काही ठिकाणी टायर पेटविण्याचा प्रकार घडला.
सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या विटा बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विटा बंदच्या आवाहनासाठी हजारो युवक रस्त्यावर आले होते. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
शिराळा तालुक्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शेडगेवाडी फाटा येथे आंदोलकांनी बंदचे आवाहन केले होते. कवठेमहांकाळ शहरातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. कुंडलापूर येथे सकाळी आंदोलकांनी टायर पेटवून निषेध व्यक्त केला.
उमदी, वाळवा, आष्टा,आमणापूर येथील बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. म्हैसाळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मृत काकासाहेब शिंदे यांना श्रदांजली वाहून या घटनेचा निषेध करण्यात आला. आष्टा येथे आंदोलकांनी मोटर सायकल रॅली काढून काकासाहेब शिंदे याना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, इस्लामपुरात बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, तर लेंगरे (ता. खानापूर) येथे आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी एसटी बसच्या काचा फोडून आंदोलन तीव्र केले.