म्हैसाळ भ्रूणहत्येचा खटला प्रलंबितच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:02 PM2018-07-08T23:02:21+5:302018-07-08T23:02:44+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचा खटला जिल्हा न्यायालयात प्रलंबितच आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयित आरोपींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील, अशी केलेली घोषणाही हवेत विरली आहे. या खटल्यातील अनेक संशयित जामिनावर बाहेर आले आहेत. सामाजिक संघटनाही गप्प आहेत.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे उघड होताच पोलिसांनी रुग्णालयावर छापे टाकले. पोलीस तपासादरम्यान ओढ्यात १९ अर्भकांचे अवशेष प्लास्टिकच्या पिशव्यांत सापडले. खिद्रापुरेच्या रुग्णालयातून पोलिसांनी कागदपत्रे जप्त केली. खिद्रापुरेच्या अटकेनंतर प्रकरणाची व्याप्ती कर्नाटकातील कागवाड, विजापूरपर्यंत वाढत गेली. याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. शिवाय केंद्रीय चौकशी समितीनेही चौकशी केली होती.
दोन मुली असलेल्या गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांची कागवाड, विजापूर येथे सोनोग्राफी केली जात होती. त्यानंतर खिद्रापुरेच्या रुग्णालयात आणून गर्भपात केला जात होता. याप्रकरणी चौदाजणांना अटक केली होती. दहा ते पंधरा हजारासाठी संशयितांकडून हे कृत्य करण्यात येत होते. यात पुरुष जातीच्या अर्भकांचाही गर्भपात झाला होता. खिद्रापुरे याच्या रुग्णालयातील गर्भ टॉवेलमध्ये गुंडाळून त्याची पहाटे विल्हेवाट लावली जात होती. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनीही केली होती. वैद्यकीय व शास्त्रीय भक्कम पुरावे जमा केले आहेत. १९ अर्भकांचे अवशेष, रुग्णालयातील दस्तावेज, विविध कागदपत्रे यावरून अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. याशिवाय काही दाम्पत्यांचा ‘डीएनए’चा अहवालही घेण्यात आला आहे.
दिग्गजांची भेट : तरीही दुर्लक्ष
पालकमंत्री सुभाष देशमुख, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री दीपक सावंत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हैसाळ येथे भेट दिली. पोलिसांकडून तपासाचा आढावा घेतला. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा केली. सामाजिक संघटनाही रस्त्यावर उतरल्या. पण दीड वर्ष होऊन गेले तरी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी शासनाकडून पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. केवळ विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली. अशा प्रकारची घटना राज्यात घडू नये, यासाठी सांगलीत वैद्यकीय समिती नियुक्त करून त्यांच्याकडून काही सूचना मागून घेतल्या. पण या सूचनाही उघड केल्या नाहीत. म्हैसाळनंतर पुन्हा राज्यात एक-दोन ठिकाणी भ्रूणहत्येच्या घडना उजेडात आल्या आहेत.
आठपैकी पाच गर्भ पुरुष जातीचे!
डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात केलेले १९ अर्भक पोलिसांनी जप्त केले होते. या अर्भकांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. त्यातील काही अर्भक कुजलेल्या अवस्थेत होते. एकूण नऊपैकी आठ अर्भकांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात पाच पुरुष जातीचे, तर तीन स्त्री जातीचे होते. यावरून केवळ पैशासाठीच गर्भपात केला जात असल्याचे उघड झाले होते.
न्यायाधीशांसमोर जबाब
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या खटल्यात १४१ साक्षीदार आहेत. त्यापैकी ५५ जणांची साक्ष थेट न्यायाधीशांसमोरच नोंदविण्यात आली आहे. पोलीस तपासादरम्यानच त्यांचे जबाब घेण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात न्यायाधीशांसमोर जबाब घेण्यात आलेला जिल्ह्यातील हा पहिलाच खटला आहे.