आमदार, खासदारांना दत्तक गावातच धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:56 PM2017-10-18T23:56:07+5:302017-10-18T23:56:07+5:30

MLAs, MPs push in adoption village | आमदार, खासदारांना दत्तक गावातच धक्का

आमदार, खासदारांना दत्तक गावातच धक्का

Next



अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आदर्श ग्रामयोजनेतून दत्तक घेतलेल्या गावांमध्येच खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्या गटाला पराभव पचवावा लागला. आमदार पतंगराव कदम आणि आ. शिवाजीराव नाईक यांनी दत्तक गावातील सत्ता राखण्यात यश मिळवले. उर्वरित पाच आमदारांनी घेतलेल्या दत्तक गावांमध्ये निवडणुका नसल्यामुळे त्यांच्याविषयीचे जनमत तिसºया टप्प्यातील निवडणुकीत कळणार आहे.
सांसद आदर्श ग्राम योजनेनुसार प्रत्येक खासदाराने आपापल्या क्षेत्रात २०१९ पर्यंत दोन गावे दत्तक घेऊन आदर्श करणे अपेक्षित आहे. यासाठी लोकसहभागही आवश्यक आहे. त्यानुसार सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयकाका पाटील यांनी आरवडे (ता. तासगाव) हे गाव दत्तक घेतले आहे. गाव दत्तक घेऊन तीन वर्षे झाली आहेत. आरवडे गाव सांगली ते भिवघाट या मुख्य रस्त्यावर असल्यामुळे पूर्वीपासूनच विकसित आहे, पण येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. खासदारांनी काही निधी या गावात खर्च केला असला तरी, मूलभूत प्रश्न सोडविण्यात त्यांना यश आले नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. येथे पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. सत्तांतर करण्यासाठी खासदार गटाने खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील गटाचे माजी पंचायत समिती सदस्य युवराज पाटील यांनी १६५३ मते घेऊन भाजपचे उमेदवार सदाशिव चव्हाण यांचा ३२० मतांनी पराभव केला. गावात राष्ट्रवादीला सरपंचपदासह आठ जागा मिळाल्या, तर खासदार गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.
आमदार आदर्श ग्राम योजनेतून सुमनताई पाटील यांनी पुणदी (ता. तासगाव) हे गाव दत्तक घेतले आहे. या गावामध्ये बाजार समितीचे विद्यमान सभापती रवी पाटील यांनी पुणदी तलावात पाणी आणण्याबरोबरच शेतकºयांसाठी कृषी अ‍ॅपसह विविध योजना राबविल्या आहेत. सुमनताई यांनी आमदार फंडातूनही तेथे कामे केली आहेत, तरीही सरपंचपदाचे उमेदवार रवी पाटील यांचा भाजपचे समर्थक उमेदवार धर्मेंद्र पाटील यांनी १०३ मतांनी पराभव केला. येथे भाजप गटाला सरपंच पदासह चार जागा मिळाल्या आहेत. पण, राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा सदस्य विजयी झाल्यामुळे बहुमत त्यांच्याकडे आहे.
जयंत पाटील यांनी हुतात्मा संकुलाचे वर्चस्व असलेले गोटखिंडी (ता. वाळवा) हे गाव दत्तक घेतले होते. तेथे मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असला तरी, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या गटाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. सरपंचपदाचे उमेदवार विजय लोंढे यांनी २९०० मते घेऊन हुतात्मा गटाचे सुभाष देशमुख यांचा ८२६ मतांनी पराभव केला.
राष्ट्रवादीला बहुमतापर्यंत मात्र पोहोचता आले नाही. त्यांना पाच जागांवरच समाधान मानावे लागले असून, हुतात्मा गटाने सरपंचपद गमाविले असले तरी, बारा जागांवर विजय मिळविला आहे.
भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी पाचुंब्री (ता. शिराळा) हे गाव दत्तक घेतले असून, येथील गड राखण्यात त्यांना यश आले आहे. सात जागांसह सरपंचपद भाजप गटाने मिळविले. सरपंचपदी अरूण सव्वाखंडे यांना संधी मिळाली आहे. तेथे राष्ट्रवादी-काँग्रेस गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांनी सांडगेवाडी (ता. पलूस) हे गाव दत्तक घेतले आहे. त्यांनी गावात मूलभूत सुविधा दिल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनेल होती. त्यापैकी जय भवानी आणि महालक्ष्मी ही दोन पॅनेल काँग्रेस पक्षाचीच होती. तिसरे पॅनेल राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचे होते. सरपंचपदी काँग्रेस समर्थक जय भवानी पॅनेलच्या मनीषा शिंदे यांनी काँग्रेसच्याच महालक्ष्मी पॅनेलच्या वैशाली सूर्यवंशी यांचा ५१४ मतांनी पराभव केला. ग्रामपंचायतीत जय भवानी पॅनेलने नऊ, तर महालक्ष्मी पॅनेलने तीन जागा मिळविल्या. राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या क्रांती रयत आघाडीला एका जागेवरच समाधान मानावे लागले.
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी कर्नाळ (ता. मिरज), आमदार सुरेश खाडे यांनी शिपूर आणि आरग-शिंदेवाडी (ता. मिरज), आ. अनिल बाबर यांनी खानापूर, आ. विलासराव जगताप यांनी लमाणतांडा-दरीबडची (ता. जत) आणि विधानपरिषदेचे आमदार शिवाजीराव देशमुख यांनी पणुंब्रे वारूण (ता. शिराळा) गाव दत्तक घेतले आहे. येथील गावांच्या निवडणुका तिसºया टप्प्यामध्ये होणार आहेत.
‘आमदार आदर्श ग्राम’ : योजना काय?
आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत प्रामुख्याने ग्रामस्थांमध्ये उत्तम आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे, कुपोषणाविषयी जाणीव, जागृती आणि प्रबोधनास प्राधान्य दिले जाईल. व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत जागृती करुन सुदृढ आरोग्याच्या सवयी विकसित करण्यासही प्राधान्य दिले आहे. किमान दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे, सामाजिक एकोपा करुन युवक व स्वयंसहाय्यता समूहांचे ग्रामविकासात योगदान घेणे, गावाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीसंबंधातील सेवांचा दर्जा उंचावणे यांसह विविध कामांची जबाबदारी आमदारांचीच आहे.
असे असेल ‘सांसद आदर्श ग्राम’...
सांसद आदर्श ग्राम योजना तीन टप्प्यात राबविली जाणार असून, अल्पकाळातील कामे तीन महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये गावाची स्वच्छता, अंगणवाडीत मुलांचा प्रवेश, वृक्षारोपण, आरोग्य सुविधा पुरवणे यासारखी कामे अपेक्षित आहेत. तसेच मध्यम मुदतीची कामे एका वर्षात आणि दीर्घ मुदतीची कामे वर्षापेक्षा अधिक काळात पूर्ण करावी लागतील. विशेष बाब म्हणजे गावाचा वाढदिवसही साजरा करण्यात येणार असून, त्यादिवशी गावाबाहेरील व्यक्तींना बोलावून त्यांचा सन्मान करणे, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याची जबाबदारीही खासदारांचीच राहणार आहे.

Web Title: MLAs, MPs push in adoption village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.