कॉँग्रेस आघाडीसंदर्भात आज नागपूरला फैसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:58 PM2018-07-03T23:58:33+5:302018-07-03T23:58:37+5:30
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असताना, उमेदवारांची घालमेल वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे घोडे जागा वाटपात अडकले आहे. बुधवारी नागपुरात दोन्ही पक्षांचे नेते आघाडीबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या इच्छुकांचे लक्ष नागपुरातील बैठकीकडे लागले आहे. दरम्यान, भाजपचे दोन्ही आमदार नागपूरला रवाना झाल्याने उमेदवार निश्चिती लांबणीवर गेली आहे. शनिवारी, ७ जुलैनंतर भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींचे सोपस्कार पूर्ण केले. आता उमेदवार निश्चितीची प्रक्रिया राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. पक्षांकडून उमेदवारी फायनल होईल का? की अपक्ष लढावे लागेल, नेत्यांच्या दबावामुळे माघार तर घ्यावी लागणार नाही ना?, अशी चिंता इच्छुकांना सतावत आहे. त्यात सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारीबाबत ठोस शब्द न दिल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे. त्यातच हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असल्याने काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे नेते नागपूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबतची चर्चा नागपुरातच रंगणार असल्याचेही बोलले जात आहे.
कॉँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड : चर्चा करणार
काँग्रेसच्या उमेदवारांबाबत नागपुरात बुधवारी दुपारी साडेचार वाजता पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी सांगलीतून माजी मंत्री प्रतीक पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील नागपूरला रवाना झाले आहेत. काँग्रेसने निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सतेज पाटील यांची कोअर कमिटीही नियुक्त केली आहे. त्यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत काँग्रेस उमेदवारीवर चर्चा होणार आहे. किमान ज्या जागांवर वाद नाही, अशा जागांची निश्चिती केली जाईल, असा अंदाज आहे.
सुधार समितीची पहिली यादी आज जाहीर होणार
जिल्हा सुधार समिती व आम आदमी पार्टी यांची निवडणुकीत युती झाली आहे. त्यांच्या जागा वाटपावरही चर्चा झाली आहे. सुधार समितीकडून उमेदवारांची पहिली यादी बुधवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे समितीचे संपर्कप्रमुख जयंत जाधव यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपप्रमाणे भाडोत्री लोक आणून शक्तिप्रदर्शन न करता, जनतेच्या मनातील उमेदवार देण्याचा प्रयत्न समितीने केला आहे. जनतेत जाऊन त्यांच्यातून उमेदवार निवडला आहे. जनतेचाही समितीला पाठिंबा वाढत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
जागावाटपाबाबत चर्चा
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चर्चा पंधरा दिवसांपासून सुरू आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रस्ताव दिले आहेत, पण ते मान्य झालेले नाहीत. काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर रात्री आघाडीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात ही चर्चा होईल. त्यानंतर आघाडीवर शिक्कामोर्तब होऊन जागावाटपाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आघाडीची चर्चा फिसकटल्यास दोन्ही काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारीही केली आहे.
राष्ट्रवादीचे तळ्यात-मळ्यात
आघाडीबाबत राष्ट्रवादीचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. राष्ट्रवादीकडून मंगळवारी दिवसभर इच्छुकांना बोलावून पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील यांच्या कोअर कमिटीने राष्ट्रवादी इच्छुकांकडून आघाडीबाबत मते जाणून घेतली. त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला जाणार आहे. स्वबळावर लढल्यास पक्षाला किती फायदा होईल, याचे आडाखे मांडण्यात येत होते. काही इच्छुकांनी, आघाडी ही अपरिहार्यता व्यक्त केली, तर काहींनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला.