संघर्षाच्या कॅनव्हासवर एकत्रिकरणाचे चित्र...
By admin | Published: October 15, 2015 11:14 PM2015-10-15T23:14:05+5:302015-10-16T00:53:43+5:30
दादा-बापू घराण्यातील वाद : संभ्रमाच्या वाटेवरून वारसदारांचे मार्गक्रमण, सोयीच्या राजकारणाचे रंग
अविनाश कोळी - सांगली वसंतदादा-राजारामबापू घराण्यातील राजकीय संघर्षाची धार कायम असली तरी, एकत्रिकरणाचे सूर अधून-मधून आळवले जात आहेत. मात्र हे सूर समर्थकांच्या आणि नेत्यांच्याही पचनी फारसे पडले नाहीत. जिल्हा बॅँक, बाजार समिती निवडणुकीत मदन पाटील यांनी जयंतरावांशी, तर कारखान्याच्या कार्यक्रमात विशाल पाटील यांनी दिलीपतात्यांशी सलगी केली. यानिमित्ताने संघर्षाच्या कॅनव्हासवर एकत्रिकरणाचे चित्र रंगविण्यात येत आहे.
वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील संघर्षाची कहाणी ६५ वर्षे जुनी आहे. सातारा जिल्हा स्कूल बोर्डाची निवडणूक या संघर्षाची नांदी होती. त्यानंतर या-ना त्या निमित्ताने हा संघर्ष दोन्ही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये सुरूच राहिला. या सर्व आठवणींना बुधवारी जयंतरावांचे कट्टर समर्थक व या संघर्षाचे साक्षीदार असलेले दिलीपतात्या पाटील यांनी उजाळा दिला. दोन्ही घराण्यांमधील संघर्ष म्हणजे कार्यकर्त्यांच्या खुमखुमीचा पाक असल्याचे मत त्यांनी मांडले. एकत्रिकरणाचा सूर त्यांनीही आळविला. एकत्रिकरणाचे चित्र रंगवून अनेकदा हा संघर्ष छुप्या पद्धतीने संशयकल्लोळ निर्माण करीत राहिला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक आणि बाजार समितीच्या निवडणुकीत जयंतरावांच्या पॅनेलमध्ये मदनभाऊंचा समावेश झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. विशेषत: दोन्ही नेत्यांमधील संघर्ष नेटाने जपणाऱ्या समर्थकांच्या भुवया जास्त उंचावल्या. महापालिकेत एकमेकांची जिरवाजिरवी करणाऱ्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनाही या क्षणिक युतीने छातीत कळ आल्यासारखे झाले. जयंतराव आणि मदनभाऊंच्या या एकत्रिकरणावर दादांचे वारसदार विशाल पाटील, प्रतीक पाटील नाराज होते. निवडणुकीत या युतीला अभद्रपणाचा शिक्काही त्यांनी मारला होता. जिल्हा बॅँकेत संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरही विशाल पाटील व दिलीपतात्या यांच्यातील संघर्ष सुरूच होता. वसंतदादा साखर कारखान्याला नोटिसा बजावल्यानंतर हा संघर्ष उफाळला होता.
अचानक वसंतदादा कारखान्याच्या गळीत प्रारंभाला दिलीपतात्यांचे अध्यक्षस्थान निश्चित झाल्याने राजकीय गोटात पुन्हा खळबळ माजली. अर्थात विशाल पाटील यांनी याला राजकीय शिष्टाचाराचे नाव देत कार्यक्रमापुरता हा विषय मर्यादित असल्याचे स्पष्ट केले. तरीही या कार्यक्रमामुळे संभ्रमाचा धूर सर्वदूर पसरला आहे.
दोन्ही घराण्यातील कटू आठवणी मांडताना एकत्रिकरणाच्या संभाव्य गोडव्याचे गीतही दिलीपतात्यांनी गायले. आता कारखान्याच्या कार्यक्रमातून एकत्रिकरणाचा गोडवा बाहेर पडणार की राजकीय धुराड्यातून संघर्षाचा धूर बाहेर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साखर कारखान्याभोवती फिरतेय राजकारण...
काही दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्याच्या चार युनिटला स्वतंत्र कर्ज देण्याच्या जिल्हा बँकेच्या कृतीवर विशाल पाटील यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर दिलीपतात्या यांनी, कारखान्यांच्या कर्ज प्रकरणात राजकारण चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. दिलीपतात्यांनी आता वसंतदादा कारखान्याला मदत करण्याचे आश्वासन दिल्याने, कारखान्यांच्या या राजकारणाने अचानक ‘यु टर्न’ घेतला आहे. भविष्यात राजारामबापू कारखान्याच्या कर्जवाटपाला असलेला विरोधही मावळू शकतो, अशी चिन्हे आहेत.
४गत विधानसभा निवडणुकीपासून इस्लामपूर मतदारसंघात माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दादा गटाच्या सक्षमीकरणास सुरुवात केली आहे. काँग्रेसची ताकद एकवटून त्यांनी जयंतरावांना शह देण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता. त्यांचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. त्यामुळे या सर्व राजकीय वाटचालीत प्रतीक पाटील अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.