‘फुटेज’ नष्ट करणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:02 AM2017-11-20T00:02:49+5:302017-11-20T00:03:42+5:30
सांगली : अनिकेत कोथळे याच्या खुनाचे सांगली शहर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेºयात चित्रीकरण झालेले फुटेज नष्ट करणाºयाला शोधून काढण्यात सीआयडी पथकाला यश आले आहे.
रविवारी त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली; पण त्याच्या नावाबाबत सीआयडीच्या अधिकाºयांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. रविवारी दुपारी सीआयडीच्या पथकाने बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अरुण टोणे व नसरुद्दीन मुल्ला या तिघांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली.
सांगली शहर पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळेला थर्ड डिग्री वापरल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. सध्या सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. २१ नोव्हेंबरला या सर्वांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे सीआयडीने तपासाला गती दिली असून आतापर्यंत ३० हून अधिक जणांचे जबाब नोंदविले आहेत.
६ नोव्हेंबरला कामटेच्या पथकाने अनिकेत व अमोलला कोठडीतून बाहेर काढून डीबी रूममध्ये आणले. दोघांनाही नग्न केले व केवळ अनिकेतलाच उलटा टांगून ‘थर्ड डिग्री’चा वापर करून त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. दोघांना कोठडीतून बाहेर काढणे, डीबी रूममध्ये आणणे, अनिकेतला मारहाण करणे, त्याचा मृतदेह पोलीस ठाण्यातून बाहेर काढून बेकर मोबाईल गाडीत ठेवणे, हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटेच्या पथकाने घटनेचे फुटेज नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीची माहिती असलेल्या तज्ज्ञास बोलावून घेतले होते. त्याच्या मदतीने हे फुटेज नष्ट केल्याचे सीआयडीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. सीआयडीने या तज्ज्ञाचा शोध लावून रविवारी त्याला चौकशीसाठी ताब्यातही घेतले. दिवसभर त्याची चौकशी सुरु होती. या तज्ज्ञाच्या नावाबाबत गोपनीयता बाळगली असल्याने, त्याचे नाव समजू शकले नाही.
अनिकेतच्या नातेवाईकांनी ७ नोव्हेंबरला पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरु केल्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन पोलिसांना जाब विचारला होता. आ. गाडगीळ यांनी सीसीटीव्ही फुटेजबाबत विचारणा करता पोलिसांनी सीसीटीव्ही बंद पडल्याचे उत्तर दिले. विश्वजित कदम व महापौर हारुण शिकलगार यांनी महापालिकेच्या तंत्रज्ञास बोलावून दि. ६ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. पण त्या दिवशीचे रात्री आठ ते पहाटे तीनपर्यंतचे फुटेज नसल्याचे आढळून आले. पण त्यानंतरचे फुटेज मिळाले होते. त्याचवेळी कामटेच्या पथकाने घटनेचे फुटेज नष्ट केल्याचे स्पष्ट झाले होते. सीआयडीने तपासातून हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला आहे. कामटेने शहर परिसरातील एका तंत्रज्ञाच्या मदतीने फुटेज नष्ट केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार रविवारी सीआयडीने यास ताब्यात घेऊन चौकशी केली.
...
व्यापाºयासह दोघांची चौकशी
अनिकेत हा हरभट रस्त्यावरील लकी बॅग्ज दुकानात कामाला होता. पगारावरुन त्याचा या दुकानाचा मालक नीलेश खत्री याच्याशी वाद झाला होता. हा वाद शहर पोलिस ठाण्यात आला होता. यामध्ये गिरीश लोहाना यांनी मध्यस्थी केली होती. अनिकेतचा पोलिस ठाण्यात खून झाल्याचे उघडकीस येताच त्याच्या नातेवाईकांनी या खुनामागे खत्री व लोहाना यांचा हात असल्याचा आरोप केला होता. तशी लेखी तक्रार त्यांनी सीआयडीकडे केली आहे. त्यामुळे सीआयडीने खत्री व लोहाना यांना चौकशीसाठी बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले असल्याचे नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
मूळ कारण शोधू : गायकवाड
सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड गेल्या १३ दिवसांपासून या तपासात आहेत. ते म्हणाले, तपास योग्यदिशेने सुरू आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नातेवाईकांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारावरही तपास सुरू आहे. अनिकेतच्या खुनामागील मूळ कारण शोधून काढले जाईल. या प्रकरणात कोणी कशाप्रकारे ‘रोल’ केला, याचा शोध घेतला जात आहे. कोणाला साक्षीदार करायचे, हे त्यानुसार ठरविले जात आहे.
संशयितांच्या माना खाली
कामटे, लाड, टोणे, मुल्ला, शिंगटे व पट्टेवाले यांना रविवारी सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी आणले होते. मूळ घटनेविषयी प्रश्न विचारले की ते माना खाली घालून गप्प बसत; कुठे राहता, हे विचारले की लगेच उत्तर देत. पण घटनेविषयी त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही. याचा तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्या वर्तनावरुन आम्ही काय समजून घ्यायचे ते घेतले असल्याचे नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
पोलीस कोठडीतील मृत्यू
रोखण्यासाठी समिती : केसरकर
सावंतवाडी : सांगली येथील घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती येत्या पंधरा दिवसांत शासनाला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.