गर्भपात आणि भ्रूण हत्येप्रकरणी सांगली पोलिसांचे कोल्हापूरात छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:42 PM2018-09-21T13:42:57+5:302018-09-21T13:48:01+5:30
सांगली येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटमधील बेकायदा गर्भपात आणि भ्रूणांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी शुक्रवारी कोल्हापूरात छापे टाकले.
सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटमधील बेकायदा गर्भपात आणि भ्रूणांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या शोधासाठी सांगलीपोलिसांनी शुक्रवारी कोल्हापूरात छापे टाकले. नांदणी, जांभळी (ता. शिरोळ) येथे भ्रूणांचे दफन केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने खोदकाम करुन भ्रूणांचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
गेल्या आठवड्यात गर्भपात व भ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी डॉ. रुपाली चौगुले, तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले या दोघांना अटक केली आहे. डॉ. स्वप्नील जमदाडे अजूनही फरारी आहे. अटकेतील डॉक्टर चौगुले दाम्पत्याची कसून चौकशी केली जात आहे.
गर्भपात केलेल्या महिला व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्या चौकशीतून कोल्हापूर व परिसरातील डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या शोधासाठी गुरुवारी रात्री सांगली पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे.
शुक्रवारी दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दोन संशयित हाताला लागले आहेत. पण तपासाच्याद्दष्टिने पोलिसांनी गोपनियता बाळगली असल्याने त्यांची नावे समजू शकली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांनी येथे गर्भपात केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नऊ गर्भपाताचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खोतकाम सुरु
गर्भपात करुन हत्या केलेल्या भ्रुणांचे नांदणी, जांभळीसह शिरोळ तालुक्यातील आणखी काही गावात दफन केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांच्यामदतीने दफन केलेल्या जागेवर खोदकाम सुरु ठेवले आहे. भ्रूणांचे अवशेष हाती लागल्यास डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध भक्कम पुराव मिळू शकतो. त्याद्दष्टिने तपासाला दिशा देण्यात आली आहे.