सुट्ट्यांमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

By admin | Published: March 13, 2016 10:52 PM2016-03-13T22:52:20+5:302016-03-14T00:12:05+5:30

तिकिटे संपली : प्रवाशांची धडपड; मेअखेर स्थिती कायम राहणार

Railway reservation is complete due to vacations | सुट्ट्यांमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

सुट्ट्यांमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

Next

सदानंद औंधे -- मिरज  --उन्हाळी सुट्टीच्या हंगामात आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी असल्याने, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसची मेअखेरपर्यंतची आरक्षित तिकिटे संपली आहेत. मे महिन्यात प्रवासासाठी आरक्षित रेल्वे तिकिटे मिळणे अवघड असल्याने, तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे. त्यामुळे तात्काळ तिकिटे मिळवून देणाऱ्या एजंटांचा व्यवसाय जोमात आहे.
उन्हाळी सुट्टीच्या हंगामातील रेल्वे तिकिटांचे आरक्षण मार्च महिन्यातच संपले आहे. तिकिटांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याने रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत. सुट्टीच्या हंगामात लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हाच स्वस्त व सोयीचा पर्याय असल्याने रेल्वे तिकीट खिडकीवर मोठी गर्दी आहे. मिरज रेल्वे स्थानकातून दररोज ६५ पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या ये- जा करतात. सुट्टीच्या हंगामात एप्रिल व मे महिन्यात रेल्वे प्रवासासाठी मोठी गर्दी असते.
मिरजेतून सुटणाऱ्या पुणे, बेळगाव, कुर्डूवाडी, पंढरपूर, परळी या पॅसेंजर गाड्यांना मोठी गर्दी आहे. गोवा, दिल्ली, अजमेर, गांधीधाम, बेंगलोर, नागपूर, मुंबई, तिरुपतीला जाणाऱ्या एक्स्प्रेसची मेअखेरची आरक्षित तिकिटे संपली आहेत. आरक्षित तिकिटांची प्रतीक्षा यादी दोनशेवर पोहोचल्याने तात्काळ तिकिटांना मागणी आहे. तात्काळ तिकिटांसाठी मागणीप्रमाणे प्रिमियम दर लागू असल्याने, दुप्पट व तिप्पट दराने तात्काळ तिकिटे घ्यावी लागणार आहेत. महागड्या तात्काळ तिकिटांसाठीही प्रतीक्षा यादी असल्याने प्रवाशांची निराशा होत आहे. दिल्ली, अजमेर, गांधीधाम, एर्नाकुलम, तिरूनेलवेल्ली, चंदीगड, बेंगलोर, अहमदाबाद या नियमित व साप्ताहिक एक्स्प्रेससाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे.
मोठ्या प्रमाणात मागणीमुळे मे महिन्याच्या सुट्टीतील आरक्षित तिकिटे संपली आहेत. मागणीप्रमाणे दर वाढणाऱ्या प्रिमियम तात्काळ तिकिटांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असली तरी, प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. गर्दी असलेल्या रेल्वे गाड्यांची तात्काळ तिकिटे एजंटांकडून मिळविण्यासाठी पाचशे ते हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत.
वातानुकूलित दर्जाची तात्काळ तिकिटे मिळणे तर अशक्यच झाले आहे. वातानुकूलित दर्जाच्या आरक्षित तिकिटांसाठी हजारो रूपये जादा द्यावे लागत आहेत. आरक्षित तिकिटे तीन महिने अगोदर मिळत असल्याने जून महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंतचे आरक्षण संपले आहे.


एजंटांचा कब्जा...
अनधिकृत तिकीट एजंट व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तात्काळ आरक्षित तिकीट मिळणे दुरापास्त ठरले आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठीच्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. केवळ पंधरा मिनिटात संपणारी तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी एजंटांचा स्थानकातील तिकीट खिडक्यांवर कब्जा आहे.

Web Title: Railway reservation is complete due to vacations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.