सदाशिवराव पाटील यांचा प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा
By admin | Published: February 26, 2017 12:44 AM2017-02-26T00:44:49+5:302017-02-26T00:44:49+5:30
नेतृत्वावर टीका; गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा आरोप
विटा : कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील वर्षभरात कॉँग्रेसच्या सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले. त्यातच व्यक्तिकेंद्रित राजकारण, गटबाजी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाल्याने त्याचा दृश्य परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाल्याचे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.
सदाशिवराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम गटात गेल्या काही वर्षांपासून धुसफूस सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत उमेदवार उतरविले होते. शिवाय काँग्रेसचे ‘ए बी’ फॉर्म नाकारले होते. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या भाळवणी गटातून काँग्रेसच्या एकमेव अधिकृत उमेदवाराविरुद्धही उमेदवार उभा केला होता. मात्र, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. शनिवारी त्यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात व जिल्ह्यात पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. मागील वर्षभरात सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले आहे व नजीकच्या काळात यात फारसा फरक होईल, असे वाटत नसल्याचे पाटील यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.
पक्षातील अंतर्गत गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारण व प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आणि याचा दृश्य परिणाम म्हणून निवडणुकीत पक्षाची सुमार कामगिरी झाली. याची जबाबदारी स्वीकारून प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दत्तोपंत चोथे यांचाही राजीनामा
सदाशिवराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच कॉँग्रेसचे विटा शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे यांनीही प्रदेशाध्यक्षांकडे पदाचा राजीनामा पाठविला आहे. माजी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात कॉँग्रेसचे काम करीत असून, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. शिवाय गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण होत असल्याने त्याला कंटाळून कॉँग्रेसच्या विटा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे चोथे यांनी सांगितले.