आष्टा परिसरात क्षारपड जमीन पुन्हा लागवडीखाली
By admin | Published: May 10, 2017 10:20 PM2017-05-10T22:20:44+5:302017-05-10T22:20:44+5:30
चाळीस वर्षांनंतर बहर : जलयुक्त शिवारमधून चर काढली, लोकसहभागातून जेसीबी, शासनाचे डिझेल
लोकमत न्यूज नेटवर्क --आष्टा : आष्टा परिसरातील आष्टा, कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडीतील हजारो एकर जमीन अतिपाण्यामुळे क्षारपड झाली होती. माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी याची पाहणी केली. जलयुक्त शिवार योजनेतून निचरा चरीसाठी लोकसहभागातून जेसीबी, तर शासनाकडून डिझेल देण्यात आले. हे काम पूर्ण झाल्याने हजारो एकर शेती बहरू लागली आहे.
आष्टा परिसरात ऊस शेतीचे क्षेत्र वाढले. अहोरात्र पाणी सोडल्याने या जमिनी नापीक होऊ लागल्या, क्षारपड झाल्या. शेती असून पीक येत नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून चर काढण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली. लोकसहभागातून चर खुदाईसाठी जेसीबी व शासनाकडून त्यासाठी डिझेल खर्च देण्यात आले. मे २०१६ मध्ये क्षारपड जमिनीतून २० फूट रुंद व ६ फूट उंच चर खोदण्यात आली. ५१८० मीटर चर खोदण्यात आली. यासाठी जेसीबी ६९२ तास १८ मिनिटे सुरु होता. याकामी राजारामबापू साखर कारखान्याने सहकार्य केले.
कारंदवाडी, मर्दवाडी परिसरातील चर खुदाई काम झाले आहे. क्षारयुक्त व जलयुक्त जमिनी पुन्हा शेती करण्यास उपयुक्त होत आहेत. ग्रामपंचायतीने माजी मंत्री आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला आहे.
- अभिजित पाटील,
उपसरपंच, मर्दवाडी
मर्दवाडी (ता. वाळवा) येथील कामाची पाहणी करताना माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत.