सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक झोपडपट्टीत एक ग्रंथालय सुरू करा : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:28 PM2018-02-24T14:28:05+5:302018-02-24T14:28:05+5:30
सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात विविध 17 झोपडपट्टया आहे. त्यामध्ये जवळपास 30 हजार घर संख्या आहे. या प्रत्येक झोपडपट्टीत एक ग्रंथालय सुरू करा. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीपस्तंभ उजळू द्या, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या.
सांगली : सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात विविध 17 झोपडपट्टया आहे. त्यामध्ये जवळपास 30 हजार घर संख्या आहे. या प्रत्येक झोपडपट्टीत एक ग्रंथालय सुरू करा. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीपस्तंभ उजळू द्या, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन कवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनांची सांगली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. गरजूंना या योजनांचा लाभ द्यावा. तसेच, विविध कर्ज योजनांचा लाभ घेऊन गरजूंनी आपली प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिष्यवृत्तीचा आढावा घेताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ एकदाच वर्षाअखेरीला देण्यात येतो. त्यासाठी 75 टक्के उपस्थिती आवश्यक असते. मात्र, या शिष्यवृत्तीचा लाभ वर्षातून दोनदा देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत.
सांगली जिल्ह्यात 21 शासकीय वसतिगृहांमध्ये 1 हजार 653 विद्यार्थी आहेत. त्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति माह 4 हजार 120 रुपये दिले जातात. अशासकीय वसतिगृहांना प्रति विद्यार्थी प्रति माह 900 रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाह योजनेबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, या योजनेंतर्गत आंबेडकर फाऊंडेशनतर्फे अडीच लाख रुपये देण्यात येतात. यासाठी संबंधितांनी प्रस्ताव पाठवावेत. महाराष्ट्रात केवळ 50 हजार रुपये प्रोत्साहनपर दिले जातात. हीरक्कम वाढवण्यासाठी चर्चा करत आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, सांगली जिल्ह्यात 35 हजार 200 दिव्यांग जन आहेत. त्यांच्यासाठी 37 शाळा आहेत. दिव्यांग जनांना मदत करण्यासाठी देशभरात जवळपास 7 हजार शिबिरे घेतली आहेत. या माध्यमातून 9 लाखहून अधिक दिव्यांग मित्रांना विविध साहित्य वाटप केले आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत 3 हजार 784 लाभार्थींना रमाई आवास योजनेचा लाभ दिला आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ 6 हजार 351 लाभार्थींना दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शासकीय विश्रामगृहे, स्वाधार योजना, आंतरजातीय विवाह, वृद्धाश्रम, दिव्यांग जन, ऍ़ट्रॉसटी विरोधी कायदा, रमाई आवास योजना, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील योजना आदिंचा आढावा घेण्यात आला.
यावेळी वाळव्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, विट्याच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) दीपाली पाटील, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.