Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:11 AM2024-05-14T11:11:19+5:302024-05-14T11:12:27+5:30
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांनी मोठ मोठ्या पैजाही लावल्या आहेत.
Sangli Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. आता पाचव्या टप्प्यातील निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदान तिसऱ्या टप्प्यात पार पडले. या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला, यामुळे नाराज होत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे सांगली लोकसभेत तिरंगी लढत झाली. भाजपाकडून संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून पै.चंद्रहार पाटील तर विशाल पाटील अपक्ष लढले. सांगली लोकसभेच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांनी मोठ मोठ्या पैजाही लावल्या आहेत.
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोण या गावातील कार्यकर्त्यांमध्ये पैज लागली आहे. रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असे पैज लावलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
पैज काय आहे?
अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर करण्यात आले आहे.या पैजेची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू आहे.
या पैजेसाठी काही जणांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी घेतली आहे. दरम्यान, सांगली कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची चर्चा आधीपासूनच सुरू होती.महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे विशाल पाटील नाराज होते. तर ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी केली होती.