सांगली महापालिका निवडणूक : अर्ज माघारीत डमी उमेदवारांचाच भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:57 PM2018-07-16T22:57:43+5:302018-07-16T23:00:37+5:30
सांगली/मिरज/कुपवाड : महापालिका निवडणुकीत सोमवारी ३९ जणांनी अर्ज मागे घेतले. मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत ६७ जणांनी अर्ज मागे घेतले असून, त्यात विद्यमान नगरसेवकांसह डमी उमेदवारांचा समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, काही नाराज मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी ९१६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ७४, भाजप ७८, शिवसेना ५२, जिल्हा सुधार समिती १७, स्वाभिमानी विकास आघाडीने १२ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अपक्षांची संख्या घटेल, असा अंदाज होता. पण तो फोल ठरला. विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची संख्या २५० च्या घरात आहे. तर तब्बल साडेसहाशेजणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. गेल्या पाच दिवसांत केवळ २८ जणांनी अर्ज मागे घेतले होते. सोमवारी आणखी ३९ जणांनी अर्ज मागे घेतले. यात सांगलीतील तीन विभागीय कार्यालयातून २०, कुपवाडमध्ये ७, तर मिरजेतून १२ जणांनी अर्ज मागे घेतला.
अर्ज अवैध होण्याच्या भीतीने बहुतांश उमेदवारांनी नातेवाईकांच्या माध्यमातून डमी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी या डमी उमेदवारांनी पहिल्यांदा अर्ज मागे घेतले. तसेच मिरजेतील आयेशा नायकवडी, शुभांगी देवमाने या विद्यमान नगरसेवकांसह माजी महापौर विवेक कांबळे यांच्या पुत्रांनी अर्ज मागे घेतले.
मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. राजकीय नेत्यांनी अपक्षांची समजूत काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालविले होते.
अपक्ष आघाडीला : भेदण्याचा डाव
नाराज झालेल्या उमेदवारांनी स्वतंत्र अपक्ष आघाडी स्थापन केली आहे. यात तब्बल १५० हून अधिक अपक्ष उमेदवार एकत्र आले आहेत. सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत या अपक्षांनी रणशिंग फुंकले आहे. अपक्षांच्या मेळाव्याची धास्ती राजकीय पक्षांनीही घेतली आहे. मंगळवारी या आघाडीतील अपक्ष उमेदवारांना फोडण्याचेच डावपेच सर्वपक्षीय नेत्यांनी सुरू केले होते. अगदी राज्य पातळीवरील नेते, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी अपक्षांचा संपर्क करून दिला जात होता. अपक्षांची आघाडी सर्वच पक्षांची डोकेदुखी झाली आहे. त्यात या आघाडीचे नेते नगरसेवक राजेश नाईक यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न विश्वजित कदम यांनी केला.
शिवसेनेत तीन अपक्ष
राष्ट्रवादी व भाजपच्या तीन बंडखोर उमेदवारांनी सोमवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रभाग १९ मधील डॉ. गीता नागे, भाजपच्या कमल हत्तीकर व प्रभाग ८ मधून कोमल सुनील चव्हाण या उमेदवारांचा समावेश आहे. या तीनही उमेदवारांना शिवसेनेच्यावतीने पुरस्कृत करण्यात येणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या चार ते पाच नाराज उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आल्याचे नगरसेवक शेखर माने यांनी सांगितले.
मिरजेत महापालिका निवडणुकीतून १९ जणांची माघार
मिरज : महापालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या १९ उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. आज (दि. १७) माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या १९ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. यामध्ये प्रभाग क्रमांक तीनमधून सोनाली मोहन वनखंडे, प्रभाग सहामधून जमीर अहमद जैलाबुद्दीन शेख, आयेशा इद्रिस नायकवडी, प्रभाग सातमधून शुभांगी आनंदा देवमाने, हेमराज अनिल सातपुते, अहमदगौस हैदर मुलाणी, करण किशोर जामदार, मंजुषा जितेंद्र कुळ्ळोळी, प्रभाग १९ मधून रमेश विश्वनाथ सिंहासने, अभिषेक संभाजी पाटील, बाळासाहेब अण्णासाहेब माने, प्रभाग वीसमधून राजू विवेक कांबळे, श्वेतपद्म विवेक कांबळे यांच्यासह १९ जणांनी माघार घेतली. अर्ज माघार घेण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने बंडखोरांना थांबविण्यासाठी विविध पक्षाच्या नेतेमंडळींची धावपळ सुरू आहे.