सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी व्हीसी सुनावणीस परवानगी, कामटेसह सहाजणांच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:27 PM2018-01-02T17:27:33+5:302018-01-02T17:31:45+5:30
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांच्या न्यायालयीन सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) घेण्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली. दरम्यान, कामटेसह सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. पुढील सुनावणी आता व्हीसीद्वारे घेतली जाणार आहे.
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांच्या न्यायालयीन सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) घेण्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली. दरम्यान, कामटेसह सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. पुढील सुनावणी आता व्हीसीद्वारे घेतली जाणार आहे.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता.
याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोठडीची सोमवारी मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत कोठडीत वाढ केली.
कामटेसह सहाजण कळंबा येथील कारागृहात आहेत. न्यायालयाच्या सुनावणीसाठी त्यांना कोल्हापुरातून सांगलीत आणले जाते. सांगलीचे पोलिस कोल्हापूर कारागृहातून त्या सर्वांना घेऊन येतात. त्याशिवाय न्यायालयाच्या आवारातही मोठा बंदोबस्त तैनात करावा लागतो.
सुरक्षेच्या कारणास्तव कामटेसह सहा जणांची कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घ्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली केली होती. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
जबाब सुरूच
अनिकेत कोथळे प्रकरणात सीआयडीने आतापर्यंत ५४ जणांचे जबाब नोंदविले आहेत. संशयितांचे कॉल डिटेल्स मिळाल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. अमोल भंडारेला घाटावर घेऊन बसलेल्या त्या दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे. जबाबाचे काम अजूनही सुरुच असल्याचे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.