सांगली पोलिसांचा कोल्हापुरात छापा; वाहन चोरट्यांची टोळी जेरबंद : चौघांचा समावेश,२२ लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:25 AM2017-12-23T00:25:34+5:302017-12-23T00:25:45+5:30
सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ट्रक, डम्परसह विविध वाहने चोरुन त्यांचे सुटे भाग करुन ते भंगार विक्रेत्यांना विक्री
सांगली : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ट्रक, डम्परसह विविध वाहने चोरुन त्यांचे सुटे भाग करुन ते भंगार विक्रेत्यांना विक्री करणाºया टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला शुक्रवारी यश आले. टोळीतील चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनांसह, वाहनांचे सुटे भाग असा २२ लाखांचा माल जप्त केला आहे.
अटक केलेल्यांमध्ये अनिस रशीद चौधरी (वय २७, रा. खंडोबानगर, मलकापूर, ता. कºहाड), मंगू तुकाराम घुणके (३०, कसबे डिग्रज, ता. मिरज), असिफ राजू शेख (३३, सुतार प्लॉट, कोल्हापूर रस्ता, सांगली) व परवेज सादखान पटेल (४१, साळे गल्ली, सोमवार पेठ, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी वाहने चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. अनिस चौधरी व मंगू घुणके सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहने चोरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये सांगलीतील ईदगाह मैदानाजवळील मैदानातून ट्रक चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत वाहने चोरलेल्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला.
वाहने चोरीच्या या कृत्यामध्ये त्यांच्यासोबत असिफ शेख व परवेज पटेल या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापुरात छापा टाकून परवेज पटेल यास ताब्यात घेतले होते. पटेलचे कोल्हापुरात भंगार विक्री व खरेदीचे दुकान आहे. अनिस चौधरी, मंगू घुणके व असिफ शेख हे तिघेही वाहन चोरल्यानंतर ते पटेलकडे घेऊन जात होते. त्याच्या भंगार विक्रीच्या दुकानात ते त्या वाहनांचे भाग सुटे करायचे. त्यानंतर परवेज पटेल स्वत:च्या दुकानातून त्यांची विक्री करायचा, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
न्यायालयाने चौघांनाही २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यातील परवेट पटेल हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यातून ट्रकसह अन्य वाहने त्यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक अंतम खाडे, हवालदार अशोक डगळे, नीलेश कदम, संतोष अस्वले, संतोष कुडचे, उदय साळुंखे, संदीप पाटील, अझरुद्दीन पिरजादे, सचिन कनप, चेतन महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाहनांच्या २१ चेसीस सापडल्या
अटकेतील टोळीकडून एक डम्पर, एक ट्रक, तीन ट्रकची इंजिन, डिझेल टाक्या, दोन स्टेअरिंग, एक बॅटरी, गॅस टाकी, गॅस कटर असा २२ लाखांचा माल जप्त केला आहे. तसेच वाहनांच्या कट केलेल्या २१ चेसीस सापडल्या आहेत. यावरुन त्यांनी सध्या तरी २१ वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या वाहनांच्या चेसीसवरुन त्यांच्या मालकांचा शोध सुरु आहे. ज्यांची वाहने चोरीला गेली आहेत, त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील ०२३३-२६७२८५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजन माने यांनी केले आहे.
सांगलीत शुक्रवारी वाहने चोरणाºया टोळीकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने वाहने जप्त केली.