सांगली : बाहुबली महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात, सुरेश पाटील : राष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:14 PM2018-01-09T15:14:33+5:302018-01-09T15:19:35+5:30
श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक सोहळा समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
सांगली : श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महामस्तकाभिषेक सोहळा समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात व स्वतिश्री जगदगुरू चारुकिर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा होत आहे. त्यासाठी देश,विदेशातून ८० लाखाहू अधिक भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी पर्वतावरील महामस्तकाभिषेकासाठी जर्मन तंत्रज्ञानांचा वापर करून चार मजली पहाड उभारण्यात आला आहे.
पर्वतावर ये-जा करण्यासाठी दोन लिफ्ट व अभिषेक सामुग्रीसाठी स्वतंत्र लिफ्टची सोय केली आाहे. दररोज ८ हजार लोक पहाडावर जाऊ शकतात. बाहुबलींच्या मुर्तीवर काहीही परिणाम होऊ नये, यासाठी पुरातन विभागाने विशेष रसायनाचा लेप दिला आहे.
आवास व्यवस्थेसाठी ११ नगरांची रचना केली आहे. त्यात ३० हजार लोक राहू शकतील. ५ हजारहून अधिक कॉटेज उभारले आहेत. दररोज ३ लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात ३० आचार्य व ४०० हून अधिक मुनी व हजारो त्यागीगण सहभागी होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र त्यागीनगरची उभारणी करण्यात आाली आहे.
चंद्रगिरी पर्वतावरून मस्तकाभिषेक पाहता यावा, यासाठी एक लाख लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सोहळ्याचे उद््घाटन ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते केले जाणार आहे.
सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची बुधवारी भेट घेऊन त्यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. कर्नाटक सरकारने या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.
रुग्णालय, प्राकृत विद्यापीठ स्थापणार
महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर श्रवणबेळगोळ येथे ५० कोटी रुपये खर्चाचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. २० एकर जागेत सर्वसोयीनीयुक्त २०० खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. तसेच याठिकाणी प्राकृत विश्वविद्यापीठही स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारने २० कोटीचा निधी मंजूर केला असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.