सांगलीत रस्त्यांची चाळण
By admin | Published: June 15, 2017 10:54 PM2017-06-15T22:54:39+5:302017-06-15T22:54:39+5:30
सांगलीत रस्त्यांची चाळण
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील अनेक रस्ते यंदाही खड्ड्यात बुडाले आहेत. गतवर्षी पावसाळ्यानंतर नागरिकांना चांगले रस्ते देण्याचे आश्वासन आयुक्त व सत्ताधाऱ्यांनी दिले होते; पण त्याचा विसर पडला आहे. त्यात पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील मुख्य रस्ते करण्याचा घाट घातला होता. वर्षभर झोपा काढल्यानंतर जागे झालेल्या महापालिकेला वरुणराजाने कृपादृष्टी दाखविलेली नाही. त्यामुळे तीनही शहरातील रस्त्यांची अगदी चाळण झाली असून, खड्ड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडत आहे.
दरवर्षी पावसात पडणारे खड्डे कमी झालेले नसून, त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. पावसाळ्यात खड्डे पडून अनेक दिवस उलटून जातात, तरीही दुरूस्ती करायला प्रशासनाला वेळ नसतो, अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्यावर्षी ऐन पावसाच्या तोंडावरच आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतला होता. शहरातील विविध भागातील रस्ते गतवर्षीही खड्ड्यात गेले होते. मुरूम, पॅचवर्कच्या कामात घोटाळा होत असल्याचे काहीजणांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आयुक्तांनी ऐन पावसाळ्यात मुरूम व पॅचवर्क करण्यास नकार देत पावसाळ्यानंतर चांगले रस्ते करू, अशी ग्वाही दिली. पण वर्षभरात यापैकी काहीच घडले नाही. सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाकडे म्हणावा तितका आग्रह धरला नाही.
सध्या तीनही शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून, अंतर्गत भागातही तीच परिस्थिती आहे. अगदी महापालिका मुख्यालयाच्या दारात भला मोठा खड्डा पडला असून, तो मुजविण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. शिवाजी मंडई, बसस्थानक, राममंदिर चौक, कॉँग्रेस कमिटी, आमराई रोड, पटेल चौक रस्ता असे कित्येक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. शहरातील नागरिक कर पालिकेत भरत असल्याने खड्डे बुजवणे व नागरिकांना चांगले रस्ते देणे हे पालिकेचे काम आहे, असे करदात्या नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांची अवस्था अधिक खराब झाली असून, खड्ड्यांमधून जाताना वाहनांना हादरे बसतात. खासगी वाहनचालकांसह रिक्षाचालक, एसटी बसेस, परिवहन बसेसचे चालकही या खड्ड्यांना प्रचंड वैतागले आहेत.
खड्डेच खड्डे चोहीकडे!
पटेल चौक ते गणपती पेठ, बसस्थानक ते महापालिका या रस्त्यांची तर चाळण झाली आहे. लक्ष्मी देऊळ ते मंगळवार बाजार या नव्याने केलेल्या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. अहिल्यादेवी होळकर चौक ते मंगळवार बाजार हा रस्ता तर वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. लक्ष्मी देवळापासून विश्रामबागकडे येणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. शंभरफुटी रस्त्याची अवस्था तर न पाहण्याजोगी झाली आहे. कोल्हापूर रस्त्याच्या तोंडालाच खड्ड्यांचा अनुभव सुरू होतो. कॉलेज कॉर्नर ते आमराई, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलिस चौकी या रस्त्यांवरून पालिकेचे पदाधिकारी, आयुक्त दररोज ये-जा करतात. पण त्यांना कधी या खड्ड्यांचा अनुभव आल्याचे दिसत नाही.