सांगली : पंचायत राज समिती दौऱ्यासाठी शिक्षक, ग्रामसेवकांकडून घेतले पैसे, शेतकरी संघटनेचा आरोप : प्रकरणाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:52 PM2017-12-21T15:52:43+5:302017-12-21T15:59:57+5:30
पंचायत राज समितीचा दौरा असल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील काही अधिकाºयांनी प्राथमिक शिक्षक व ग्रामसेवकांकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे केली आहे.
सांगली : पंचायत राज समितीचा दौरा असल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षक व ग्रामसेवकांकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवकांकडून पैसे घेताना वर्गवारी करण्यात आली होती. सर्वाधिक पैसे तासगाव तालुक्यातील शिक्षकांकडून घेण्यात आले.
येथील शिक्षकांकडून प्रत्येकी चारशे रुपये, वाळवा तालुक्यातील शिक्षकांकडून प्रत्येकी शंभर, पलूसमधून प्रत्येकी शंभर असे प्रत्येक तालुकानिहाय वेगवेगळ््या रकमा घेतल्या आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामसेवकांकडूनही पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या नावावर पैसे गोळा करण्यात आले आहेत.
वास्तविक पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून करण्यात आला आहे. तरीही शिक्षक व ग्रामसेवकांकडून अशाप्रकारचे बेकायदेशीर पैसे गोळा का करण्यात आले.
या पैशाची कोणतीही पावती संबंधितांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुनील फराटे यांनी केली आहे. शेतकरी संघटनेच्या या आरोपामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणखी अडचणीत आले आहे.
जिल्हा परिषद सभेतही संताप
पंचायत राज समितीच्या दौऱ्यासाठी स्वीय निधीतून १८ लाखाचा खर्च दाखविण्यात आला आहे. सांगलीतील दोन दिवसाच्या दौऱ्याचा हा खर्च प्रचंड असून यात गोलमाल असल्याचा संशय विरोधी सदस्यांनी नुकत्याच झालेल्या सभेत व्यक्त केला होता. याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली होती. बहुमताने खर्चाच्या मंजुरीचा हा विषय मंजुर करण्यात आला आहे.
इतकी आहे संख्या
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. ग्रामसेवक पाचशेच्या घरात आहेत. यांच्याकडून रक्कम घेतल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप या आकडेवारीकडे पाहून गंभीर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष याची कितपत दखल घेणार याकडे शेतकरी संघटनेचे लक्ष लागले आहे.