कोथळे प्रकरणानंतर आणखी एक प्रताप, पोलीस ठाण्यात सख्ख्या भावांना बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:51 PM2018-03-29T15:51:11+5:302018-03-30T05:40:52+5:30
कौटूंबिक वादातून झाडलेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या गणेश दशरथ गंभीरे ( वय २२, रा. रामकृष्ण नगर कुपवाड) या तरुणास कुपवाड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत शिंदे यांच्यासह चौघांनी काठीने बेदम मारहाण केली
सांगली : कौटूंबिक वादातून झाडलेल्या भांडणाची तक्रार देण्यास गेलेल्या गणेश दशरथ गंभीरे ( वय २२, रा. रामकृष्ण नगर कुपवाड) या तरुणास कुपवाड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत शिंदे यांच्यासह चौघांनी काठीने बेदम मारहाण केली. बुधवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला आहे.|
अनिकेत कोथळेचा मारहाण करुन खून केल्याच्या घटनेला अजून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला नाही, तोपर्यंत सांगली पोलीस दलाचा आणखी एक कारनामा कुपवाड पोलिसांच्या कृतीमुळे उजेडात आला आहे. मारहाणीत गणेश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाचे हाड मोडले आहे. शरिरावरही मारहाणीचे व्रण उठले आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विश्रामबागचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी गुरुवारी दुपारी जखमी गणेशचा जबाब नोंदवून घेतला. यामध्ये त्याने कशाप्रकारे माहारण केली, याचा उलगडा केला आहे. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक शिंदेसह चार पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी गणेशच्या नातेवाईकांनी केली आहे.
गणेशचे कौटूंबिक वादातून भावाशी भांडण झाले होते. यातून त्यांच्यात मारामारीही झाली होती. याप्रकरणी गणेश कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेला होता. सहाय्यक निरीक्षक शिंदे यांची त्याने भेट घेतली. पण शिंदे यांनी त्याची तक्रार नोंदवून घेण्याचा आदेश दिला नाही.
गणेशला मंगळवारी दिवस आणि रात्रथर पोलीस ठाण्यात बसवून घेतले. गणेशने याचा जाब विचारल्यानंतर शिंदेसह चार पोलिसांनी त्याला बुधवारी पहाटे तीन वाजता काठीने बेदम मारहाण केली. सकाळी त्याला घरी जाण्यास सांगितले.
घरी गेल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर घरच्यांनी त्याला उपचारासाठी हलविले. दरम्यान सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, आसिफ बावा, महेश खराडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
दादागिरी कायम
अनिकेत कोथळे प्रकरणानंतर पोलीस दलास धक्का बसला. तेंव्हापासून गुन्हे प्रगटीकरणाचे काम संथगतीने सुरु राहिले. गुन्हेगारीच प्रचंड वाढ झाली. लुटमार व घरफोडीच्या गुन्ह्यांचा मालिकाच सुरु राहिली. गेल्या महिन्याभरात दहा खून झाले. वाढत्या गुन्हेगारीला वर्दीचा धाक दाखविण्याऐवजी गणेश गंभीरेला केलेली मारहाण म्हणजे पोलिसांची दादागिरी अजूनही कायम असल्याचे चित्र आहे.