सातारकरांनी ओलांडली भीमा नदी मुख्यमंत्री देणार खेड गावाला भेट : गावकुसाबाहेरच्या २४ कुटुंबांना मिळालं हक्काचं घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:02 AM2017-12-29T01:02:12+5:302017-12-29T01:02:12+5:30
स्वप्निल शिंदे।
सातारा : वेण्णा नदीवर गावकुसाबाहेर राहणाºया कातकरी समाजाच्या तब्बल २४ कुटुंबीयांना सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीने आपले हक्काचे घर बांधून दिले. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा नदी ओलांडून घोडेगावच्या आदिवासी केंद्रातून पदाधिकाºयांनी दुर्मीळ दाखलेही आणले.
एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात शबरी आदिवासी घरकूल योजना प्रभावी राबवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, लवकरच ते या गावाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. सातारा शहरालगतच असलेले खेड हे गाव वेण्णा नदीच्या काठी वसले आहे. शहरालगत गाव असल्याने औद्योगिकीकरण आणि दिवसेंदिवस इमारतीची संख्या वाढत आहे.
शहरीकरणामुळे गावचा विकास होत असताना गावात असणारा कातकरी समाज आजही या विकासापासून कोसोदूर होता. वेण्णा नदीत मासेमारी करून आजही आपला उदरनिर्वाह करत आहे. गावाच्या एका बाजूला असलेला कातकरी समाज आपल्या पालात राहत होता. हे पाल म्हणजे एक झोपडीच.
गावातील तब्बल ५६० जणांना ऊन, वारा आणि पाऊस या तिन्ही ऋतुंमध्ये याच ठिकाणी राहावे लागत होते. त्यामुळे त्यांना हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी खेड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच मिलिंद कदम यांनी पुढाकार घेतला. योजनेचा लाभ घ्यायचा तर कागदपत्रे, घर बांधण्यासाठी जागा आदी प्रश्न होतेच. या कातकरी समाज अशिक्षित असल्याने त्यांच्याकडे कोणत्याही स्वरुपाची कागदपत्रे नव्हती, त्यामुळे त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार होते. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
मग ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वखर्चातून त्यांचे जातीचे दाखले व इतर कागदपत्रे मिळवले. तसेच जिल्हाधिकाºयांच्या मालकीची जागा उपलब्ध करून शबरी योजनेचे आवश्यक ते प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवले. त्यापैकी शासनाने २४ प्रस्ताव मंजूर केले. ग्रामपंचायतीच्या मदतीने १ लाख ३२ हजार रुपयांचा निधी खर्चून शौचालयसह मोफत पक्के घर बांधून देण्यात आले. आज कातकरी वस्तीमध्ये २४ जणांची सुसज्ज अशी पक्की घरे दिमाखात उभी आहेत.
मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
ग्रामपंचायतीने फक्त घरं दिली नाहीत तर घरासोबत सिमेंटचे रस्ते, नळ पुरवठा योजनेतून पाणी तसेच वीजही उपलब्ध करून दिली आहे. वस्तीच्या बाजूने संरक्षित भिंत, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह आणि मुलांसाठी जिल्हा परिषदेची शाळा अशा सोयीसुविधा उभारून खºया अर्थाने त्यांच्या २४ जणांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे या वस्तीतील लोकही होय, मी लाभार्थी असे म्हणून लागले आहेत.खेड ग्रामपंचायतीने योजना राबवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, १८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.
गावातील बहुसंख्य लोकांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्यापैकी १३ जण अजून वंचित आहेत. त्यांचे आदिवासी दाखले नसल्याने अडचण आहे; पण लवकरच त्यांनाही हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
-मिलिंद कदम, सभापती, सातारा पंचायत समिती
कातकरी समाजाकडे घरासाठी जागा, उत्पन्नाचे दाखले, आदिवासी दाखले, वारस नोंद नव्हती. यासाठी ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेत कागदपत्रे स्वत: गोळा केली. त्यानंतर चोवीस कुटुंबांची योजना पर्ू्ण केली. लवकरच उर्वरित तेरा जणांना पक्के घर बांधूून देऊन शंभर टक्के योजना राबविण्याचा प्रयत्न आहे.
- ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामसेवक
आम्ही अनेक वर्षांपासून झोपडीत राहत होतो. आम्हाला वाटलेही नव्हते कधी आम्ही हक्काच्या घरात जाऊ; पण शबरी योजनेतून आम्हाला घराचे घर मिळाले.
- नंदू अंतू पवार,
लाभार्थी