चंद्रकांतदादा पहा, गडकरींनाही रस्त्याची लाज वाटली : दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:30 PM2018-08-29T15:30:11+5:302018-08-29T15:36:24+5:30
: राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही लाज वाटली आहे. त्यामुळे आता या गोष्टीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांनी घ्यावी, असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना लगावला.
सांगली : राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही लाज वाटली आहे. त्यामुळे आता या गोष्टीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांनी घ्यावी, असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना लगावला.
ते म्हणाले की, रस्त्यांमुळे निश्चितच एसटीला फटका बसत आहे. बसेस खराब होणे, प्रवाशांना त्याचा त्रास होणे व परिणामी एकूण उत्पन्नावर त्याचा परिणाम दिसत आहे. राज्यातील महत्त्वाचे रस्ते खराब असल्याबाबत आता मी सांगायची गरज नाही.
गडकरींनी स्वत:च मुंबई-गोवा महामार्गाबद्दल जाहीर वक्तव्य केले. अशा रस्त्यांची मला लाज वाटते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील रस्त्यांबाबत चंद्रकांत पाटील यांनी दखल घ्यावी. मुंबईतील रस्त्यांबाबत टीका केली जात असली तरी, आता त्याठिकाणी चांगले रस्ते केले आहेत. खराब रस्त्यांबाबत तातडीने दखल घेतली जात आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित रस्त्यांबद्दल दखल घ्यायला हवी. ही जबाबदारी ज्यांची असेल त्यांनी पहावे.
भाजप नेत्यांनी शिवसेनेला गृहीत धरणे सोडावे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी शिवसेनेला विचारण्याची किंवा आम्ही नकार दिल्यानंतर त्याची चर्चा करण्याऐवजी स्वतंत्रपणे आम्ही लढत आहोत, हे त्यांनी गृहीत धरावे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तर, शिवसेनेला त्याचा फायदाच होईल. त्यामुळे या गोष्टीची आमची तयारी आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे. मराठा आरक्षणाबाबतही आम्ही आग्रही आहोत. भाजपला जर याबाबत श्रेय घ्यायचे असेल तर, त्यांनी घ्यावे, पण आरक्षण द्यावे. मराठा समाजाने शांततापूर्ण मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे त्यांनी संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
ईव्हीएम नको, बॅलेटच हवे
राज्यात व देशात एकाचवेळी अनेक पक्षांनी ईव्हीएमबद्दल (मतदान यंत्र) तक्रारी केल्या आहेत. सर्वच पक्ष मतपत्रिकेबद्दल आग्रही आहेत. शिवसेनासुद्धा त्याच मताची आहे. आगामी सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून पार पाडल्या जाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे, असे रावते म्हणाले.
सांगलीच्या स्टॅँडचा प्रश्न मार्गी लागेल
सांगलीत नव्या जागेत एसटी स्टॅँड उभारण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यास प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा प्रश्न मार्गी लागेल, असे रावते म्हणाले.
2