मिरजेत हरविलेले सात तोळे दागिने पोलिसांनी केले हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:42 PM2017-10-28T13:42:33+5:302017-10-28T13:47:16+5:30
मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले.
मिरज , दि. २८ : मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले.
छाया चव्हाण या मिरज-सांगली रस्त्याने प्रवास करत असताना रेल्वे पुलाजवळील मारूती मंदिर परिसरात त्यांची सात तोळे दागिने व मोबाईल असलेली पर्स हरविली होती.
पर्समधील मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर हिंदी भाषेत बोलणाऱ्या अज्ञाताने पर्स सापडली असून बसस्थानकावर परत आणून देत असल्याचे सांगितले. मात्र नंतर मोबाईल बंद करण्यात आल्याने छाया चव्हाण यांनी गांधी चौक पोलिसात पर्स व दागिने गहाळ झाल्याची तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने मारूती मंदिर परिसरात हरविलेल्या दागिन्यांचा शोध सुरू केल्यानंतर जोगी झोपडपट्टीतील सोहेल जोगी या बालकास पर्स सापडल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी जोगी याच्या घरात ठेवलेली पर्स शोधून काढून पर्समधील सात तोळे दागिने व मोबाईल ताब्यात घेतला.
पोलिसांनी छाया चव्हाण यांना बोलावून दागिने व मोबाईल परत केला. भाऊबीजेदिवशीच हरविलेले दागिने पोलिसांनी शोधून काढून परत दिल्याने भाऊबीजेची ही भेट दिल्याची प्रतिक्रिया छाया चव्हाण यांनी व्यक्त केली.