प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच शेट्टींची माझ्यावर टीका- सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 06:33 PM2017-08-20T18:33:21+5:302017-08-20T18:33:37+5:30
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी माझा जप सुरू केला आहे.
इस्लामपूर, दि. 20 - प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी माझा जप सुरू केला आहे. संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी त्यांचा
मार्ग स्वीकारावा, मी माझ्या मार्गाने जाईन. शेती आणि शेतक-यांच्या प्रश्नांचा त्यांचा अभ्यास मोठा आहे. त्यामुळे केंद्राला आणि राज्याला
त्यांनी सूचना कराव्यात. आम्ही त्या स्वीकारू, असा उपहासात्मक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना लगावला. इस्लामपूर येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. खा. शेट्टी आणि मंत्री खोत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
एकमेकांच्या भानगडी उघड करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मंत्री सददाभाऊ खोत म्हणाले, भविष्यात शेट्टी यांनी माझ्यावर कितीही टीका
केली तरी त्याची मी दखल घेणार नाही किंवा त्याला प्रत्युत्तरही देणार नाही. माझ्या हकालपट्टीचा निर्णय घेणाºया समितीमध्ये असलेल्या
सदस्यांपेक्षा शेतकरी चळवळीत मी आणि शेट्टींनी जास्त काळ काम केले आहे. अशी परिस्थिती असतानाही त्यांनी माझ्यावर कार्यवाही केली आहे.
रघुनाथदादांना शेतकरी चळवळीतून खड्यासारखे बाजूला करण्याचे काम शेट्टी यांनी केले आहे. आता ही वेळ त्यांनी माझ्यावरही आणली आहे. शेतकरी
चळवळीतील उल्हास पाटील यांचाही त्यांनी वापर केला आहे. प्रस्थापितांवर तोफा डागण्यासाठी माझाही वापर करण्यात आला.
राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेत पुणे येथील महात्मा फुले वाड्यात जाऊन फुले यांचे दर्शन घेतले आणि भाजपला पाठिंबा देऊन मी चूक केली, असे
भावनिक वक्तव्य केले. यामागे त्यांना मला संघटनेतून बाजूला करण्याचाच डाव असल्याचे त्यावेळीच स्पष्ट केले होते. त्यानंतर राष्ट्रपती निवडीवेळी
त्यांची भूमिका काय होती? असाही टोला खोत यांनी मारला.