सांगलीत कृष्णा नदीत बूडून ऐन दिवाळीत शाळकरी मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:21 PM2017-10-19T15:21:04+5:302017-10-19T15:29:07+5:30
दिवाळीत किल्ला बनविण्यासाठी कृष्णा नदीकाठावर माती आणण्यास गेलेल्या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. वैभव शरद कांबळे (वय १४, रा. नवीन वसाहत, शाहू कॉलनी) असे मुलाचे नाव आहे. बुधवारी त्याचा मृतदेह हरिपूर येथे नदीपात्रात मिळून आला.
सांगली , दि. १९ : दिवाळीत किल्ला बनविण्यासाठी कृष्णा नदीकाठावर माती आणण्यास गेलेल्या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. वैभव शरद कांबळे (वय १४, रा. नवीन वसाहत, शाहू कॉलनी) असे मुलाचे नाव आहे. बुधवारी त्याचा मृतदेह हरिपूर येथे नदीपात्रात मिळून आला.
याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. वैभव कांबळे हा आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह शाहू कॉलनीत राहतो. त्याचे वडील मोलमजुरी करतात. तो नववीत शिकत होता. सोमवारी सकाळी अकरा वाजता तो किल्ला बनविण्यासाठी माती आणण्यास कृष्णा नदीवरील माईघाटावर गेला होता. माती भरल्याने हातपाय धुण्यासाठी तो नदीपात्रात गेला. त्यानंतर तो नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला.
बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह हरिपूर येथील कृष्णामाई मंदिराच्या मागील नदीकाठावरील झुडुप अडकलेला आढळून आला. नागरिकांनी सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती देताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वैभवची घरची परिस्थिती बेताची असून त्याच्या मृत्यूने ऐन दिवाळीत कुटूंबियावर शोककळा पसरली आहे.