...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:55 PM2024-04-16T18:55:11+5:302024-04-16T18:58:19+5:30

Sangli Lok Sabha: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विशाल पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

then I will withdraw from the election congress Vishal Patil big statement after filling the application form | ...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

Congress Vishal Patil ( Marathi News ) : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत सुरू असलेला संघर्ष दिवसागणिक अधिकाधिक वाढत चालला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली असली तरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केला. हा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. "सांगलीची जागा काँग्रेसला सुटून या जागेवर काँग्रेसचाच इतर कोणी उमेदवार दिला जाणार असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे," असं ते म्हणाले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की, "भाषणात बोलताना स्वाभाविकपणे काही भावना उफाळून येतात. काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा राहिला आहे. वसंतदादा पाटलांनी या जिल्ह्यात काँग्रेस घराघरात रुजवली. असं असताना या जिल्ह्यात मागच्या आणि आताच्या निवडणुकीतही काँग्रेसचा उमेदवारच दिला जात नसेल, तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे. काँग्रेसचा उमेदवार मीच असलो पाहिजे, असं काही नाही. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की, माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून तुम्ही काँग्रेसची उमेदवारी घालवणार असाल तर मी थांबायला तयार आहे. मी आधीच सांगितलं की, राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनीही माझ्याकडे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही आमच्याकडे या. राज्य नेतृत्वाकडून असा कोणताही सल्ला आलेला नाही. मात्र असा सल्ला आला असता तरी आम्ही सांगितलं असतं की आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढेही ठाम राहू," अशा शब्दांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

राजकीय विरोधकांना इशारा 

काँग्रेसला ही जागा मिळू नये, यासाठी काही व्यक्ती प्रयत्नशील असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला आहे. "काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं हे बंड आहे. कारण काँग्रेसच्या हक्काची जागा जाऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. या जागेवर काँग्रेसचा अधिक सक्षम इतर कोणी उमेदवार असेल तर द्या, मी माघार घ्यायला तयार आहे. पण या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा, काही घराणी संपावी, असा प्रयत्न सुरू आहे. आज माझी वेळ आहे, उद्या आणखी कोणाची वेळ येईल. मी असेल किंवा विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील हे सर्वजण विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यात एकसंघपणे काम करतोय, हे कदाचित कोणालातरी पाहावलं जात नसेल. त्यांचा आम्ही निवडणूक संपल्यावर समाचार घेऊ," असा इशारा विशाल पाटलांनी दिला. 

दरम्यान, आम्ही दोन अर्ज काँग्रेस पक्षाकडून भरले आहेत, एक अर्ज अपक्ष भरला आहे आणि आणखी एक अर्ज भरण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली आहे.

Web Title: then I will withdraw from the election congress Vishal Patil big statement after filling the application form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.