पोटाला पैसा न्हाई, चांगलं अन्नच द्यावं लागीतं - राहीबाई पोपेरे
By अविनाश कोळी | Published: September 4, 2023 08:14 PM2023-09-04T20:14:16+5:302023-09-04T20:14:29+5:30
पोपेरे म्हणाल्या की, लग्नानंतर २५ वर्षे गायीच्या गोठ्यात आन् रानात आयुष्य गेलं. गोठ्यातच चार बाळंतपणं झाली.
सांगली: ‘देशी बिया, देशी गाय आपण इसरलो...हायब्रीड अन् केमिकलच्या नादी लागून आजारपण घरात आणलं. शेतातून चांगलं अन्न पिकवायचं सोडून पैसा पिकविण्यामागं सारे लागलेत. पोटाला पैसा न्हाई, चांगलं अन्नच द्यावं लागतं. तरच शरीर चांगलं राहील’, असे मत बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यसैनिक अॅड. जे. जी पाटील यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात सोमवारी पोपेरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सेवानिवृत्त कृषी सचिव नानासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.
पोपेरे म्हणाल्या की, लग्नानंतर २५ वर्षे गायीच्या गोठ्यात आन् रानात आयुष्य गेलं. गोठ्यातच चार बाळंतपणं झाली. कधी आजार म्हाईत नव्हता. घरात आजारपण वाढलं तसंच माझ्या मनात पाल चुकचुकली. शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली बसून इचार केला अन् कळालं मातीला आजारी पाडल्यानं घरात आजारपण येतंय. तवाच ठरवलं आता रानात केमिकल अन् हायब्रीड बिया टाकायच्या न्हाईत. घरातनंच मला विरोध झाला, पण मी थांबले न्हाई. बचत गटातल्या महिलांना देशी बियांचं वाण दिलं. देशी वाणाचं महत्त्व गावाला सांगितलं. हळूहळू साऱ्यांना ते पटलं. आता दीडशे गावात देशी वाणाची केमिकल नसलेली शेती लोकं करतात. साडेतीन हजार महिला यासाठी काम करतात. पण सगळीकडंच असं चित्र दिसायला हवं. यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, इसरेडचे संस्थापक किरण कुलकर्णी, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन उपस्थित होते. एच. वाय. पाटील यांनी स्वागत केले.
ऊस पोटाला खाताय का?
सांगली, कोल्हापूर, साताऱ्याकडं आलं की सगळीकडं उसाची रानं दिसतात. त्यातनं पैसा भरपूर मिळतो. पण आपली भरडधान्यं लोकं इसरल्यात. पोटाला खायचं असेल तर ऊस चालतो का? की पोटात पैसा घालीता? असे सवाल पोपेरे यांनी उपस्थित केले.
चौकट
अनुभवातल्या तत्त्वज्ञानाने सारे भारावले
‘ज्याच्यात चमक हाय, त्यात धमक न्हाय’, ‘मरून जायचं, पण सरून जायचं न्हाई’, ‘माती चांगली, तर आरोग्य चांगलं’ अशा प्रकारच्या अनुभवातल्या तत्त्वज्ञानातून पोपेरे यांनी दिलेले संदेश ऐकून उपस्थित भारावले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.