टेंभू, ताकारी, म्हैसाळ दोन वर्षात पूर्ण करणार-- गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:30 AM2017-09-02T00:30:35+5:302017-09-02T00:34:07+5:30
सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारने पंधरा वर्षात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या सुधारित खर्चास मंजुरी दिली नाही. पण ते काम आम्ही तीन वर्षात पूर्ण करून दाखविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारने पंधरा वर्षात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या सुधारित खर्चास मंजुरी दिली नाही. पण ते काम आम्ही तीन वर्षात पूर्ण करून दाखविले. जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी पाच हजार कोटींची तरतूदही केली असून येत्या दोन वर्षात कामे पूर्ण होतील, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केला.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळीराजा अॅप, शुध्द पाणी एटीएम आणि आॅनलाईन बेदाणा विक्रीचा प्रारंभ जलसंपदामंत्री महाजन यांच्याहस्ते झाला, यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, माजी आमदार रमेश शेंडगे, संचालक दिनकर पाटील, बाळासाहेब बंडगर, भानुदास पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, गोपाळ मर्दा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कुमार पाटील, अभिजित चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पंधरा वर्षे सलग सत्तेवर होते. तरीही त्यांनी सिंचन योजनांना, सुधारित प्रशासकीय कामांना मंजुरीच न दिल्यामुळे योजनांची कामे पूर्ण झाली नाहीत. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर, शेतकºयांच्या हितासाठी सिंचन योजना पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली. राज्यातील ६० ते ६५ सिंचन योजनांची कामे ठप्प झाली होती. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजनांचाही समावेश होता. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शेतकºयांच्या हिताला आम्ही प्राधान्य दिले. अपूर्ण योजनांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली. या कामासाठी पाच हजार कोटीच्या निधीचीही तरतूद केली आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंचन योजनांची शंभर टक्के कामे पूर्ण होतील.
ते म्हणाले की, सध्याच्या उपलब्ध पाण्यावर शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे सिंचन योजनांचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे देण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात टेंभू योजनेची निवड केली आहे.
बंद पाईपलाईन आणि शंभर टक्के ठिबक सिंचन करण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के शेतीला पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. बाजार समितीला जागेची अडचण असून, तो प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी केली. बाजार समितीचे उपसभापती रामगोंडा संती यांनी आभार मानले.
सांगलीत बेदाणा, हळद निर्यात केंद्र सुरू करणार
सांगलीत बेदाणा, हळद आणि गुळाची हजारो कोटींची वार्षिक उलाढाल असतानाही, येथे निर्यात केंद्र नाही. त्यामुळे सांगली बाजार समितीने निर्यात कक्षाचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठवून द्यावा, त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी घोषण कृषी व पणन राज्यमंत्री खोत यांनी यावेळी केली.
संजयकाकांकडून अजितराव घोरपडेंवर टीकास्त्र
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजार समितीमधील कर्मचाºयांच्या पदोन्नतीमधील फरकाच्या रकमेवरून संचालक मंडळावर टीका केली होती. पणन संचालकांकडेही तक्रार केली होती. हाच धागा पकडून खा. संजयकाका पाटील यांनी भाषणात घोरपडेंचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मी म्हणेल तसाच कारभार झाला पाहिजे, अशा मानसिकतेत काही नेते आहेत. त्यांचे ऐकले नाही की लगेच, संस्था वाईट म्हणून टार्गेट करण्याची वृत्ती संकुचित आहे. यापुढे संस्था चांगल्या चालण्यासाठी संजयकाका छातीचा कोट करून पुढे असेल. ‘आ. पतंगराव कदमसाहेब, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर?’, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कदम यांनीही, गिरीश महाजनांच्या साक्षीने ‘मी तुमच्याबरोबरच आहे’, असे सांगितले.
मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांचा सत्कार करू : कदम
दुष्काळग्रस्तांच्यादृष्टीने टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजना फार महत्त्वाच्या आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न केले. पण, यश आले नाही.या योजनांच्या सुधारित खर्चाच्याप्रशासकीय मान्यतेसाठी मी एकदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटलो. त्यांनी तातडीच्या बैठका लावून तीन वर्षात सिंचन योजनांच्या सुधारित खर्चासमंजुरी दिली.त्यामुळे दुष्काळग्रस्तांतर्फे सांगलीत फडणवीस व महाजन यांचा सत्कार करणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जाहीर करताच, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. भाजपचे कार्यकर्ते आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या चेहºयावरील आनंद मात्र ओसंडून वाहत होता.