वसंतदादांचे नाव बदलणे निषेधार्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2015 11:49 PM2015-11-06T23:49:16+5:302015-11-06T23:55:10+5:30
शिवाजीराव देशमुख : सम्राट महाडिक यांचे उपोषण
इस्लामपूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी नियमावली आहे. मात्र वसंतदादांच्या नावाऐवजी अन्य नाव देण्यासाठी आयत्यावेळचा ठराव करून नाव बदलणे, ही निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे दादांचे नाव कायम राहण्यासाठीच्या सनदशीर लढ्यात आपण न्याय मिळेपर्यंत बरोबर राहू, अशी ग्वाही विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी शुक्रवारी दिली.
वाळवा पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून, आ. जयंत पाटील आणि पदाधिकारी, प्रशासनावर टीकेची झोड उठवली. सायंकाळी पाच वाजता देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली.
देशमुख म्हणाले, दादांसारख्या महनीय व्यक्तीबाबत खोडसाळपणा करणे निषेधार्ह आहे. राजारामबापूंच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्याचवेळी कोणी दादांच्या नावाला विरोध करीत असेल, तर ते सहन केले जाणार नाही.
जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी चुका सुधारून आता तालुका, जिल्ह्याच्या पालकत्वाची भूमिका घ्यावी. सभागृहाला वसंतदादांचे नाव कायम ठेवावे.
जि. प. सदस्य सम्राट महाडिक म्हणाले, राजारामबापूंच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र दादांच्या नावाला शासननिर्णयाने मान्यता असताना, विरोध खपवून घेणार नाही.
दिवसभरात काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ‘बळीराजा’चे बी. जी. पाटील, स्वाभिमानीचे अॅड. यु. एस. संदे, भाजपचे विजय कुंभार, शिवसेनेचे दि. बा. पाटील, रिपाइंचे अरुण कांबळे, अॅड. एच. आर. पवार, पं. स. सदस्य प्रकाश पाटील, नजीर वलांडकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम यांची भाषणे झाली.
उपोषणस्थळी शैलजा पाटील, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, अभिजित पाटील, आ. शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सरपंच गौरव नायकवडी, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. चेतन शिंदे, वैभव पवार, सतीश महाडिक, सोमनाथ फल्ले, सुजित थोरात, जलाल मुल्ला, अॅड. फिरोज मगदूम, मोहन मदने, राजेंद्र शिंदे, पं. स. सदस्य अजित भांबुरे, प्राजक्ता देशमुख, राजश्री माळी, अमित ओसवाल, विशाल शिंदे, मुनीर इबुशे, मन्सूर वाठारकर, शिवसेनेचे शकील सय्यद, एल. एन. शहा, बाबा सूर्यवंशी, आनंदराव पाटील, हर्षवर्धन पाटील, मोहन वळसे, गणेश परीट, रणजित आडके, सुरेश पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)