कणदूर बनलंय सैनिकांचे गाव
By Admin | Published: November 5, 2014 09:44 PM2014-11-05T21:44:36+5:302014-11-05T23:43:56+5:30
नवी ओळख : स्पर्धा परीक्षेतून आठजण अधिकारी
सहदेव खोत - पुनवत -शिराळा तालुक्यातील कणदूर गावची अलीकडे सैनिक व अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत गावातील ३१ युवकांनी सैन्य व पोलीस दलात नोकरी मिळविली असून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ८ जणांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारीपदाचा बहुमान मिळविला आहे. गावातील युवकांच्या या यशामुळे बेरोजगारांना प्रेरणा मिळत आहे.
कणदूर हे सुमारे साडेतीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले वारणाकाठचे गाव. उच्च प्रतीच्या गुळाची निर्मिती करणारे गाव म्हणून गावची ओळख आहे. गावात ग्रामसचिवालय, बँक, वाचनालय, उपक्रमशील तरुण मंडळांबरोबरच गावातील मुलांना व युवकांना शिक्षण देणारी जि. प. शाळा, दत्त विद्यालय, पी. डी. पवार उच्च माध्यमिक विद्यालय व अंबिका माध्यमिक विद्यालय ही शिक्षण केंद्रे, तर युवकांना कुस्ती खेळाचे धडे देणारी तालीम, ही गावची वैशिष्ट्ये.
दोन-तीन वर्षांपूर्वी गावातील जगन्नाथ पाटील, हरिदास पाटील, शीतल पाटील, अमर पाटील, शीतल पाटील, महादेव पाटील, राहुल पाटील, सुहास कांबळे यांनी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अधिकारीपद पटकावून गावातील युवकांपुढे खरा आदर्श निर्माण केला. त्यांच्या यशातून प्रेरणा घेऊन आज गावातील असंख्य युवक-युवती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताहेत.
दुसरीकडे सुमारे ३० माजी सैनिक असलेल्या या गावात युवकांनी अलीकडे सैन्य व पोलीस दलात जाण्याचा धडाका लावला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत गावातील तब्बल ३१ युवकांनी सैन्यदलात व पोलीस दलात नोकरी मिळविली आहे. आज गावातील आठजण अधिकारी, ४५ जण आजी सैनिक, ३० जण माजी सैनिक, तर सुमारे २० जण पोलीस दलात कार्यरत आहेत. शिवाय असंख्य युवकांनी अभियांत्रिकीमधील पदवी व पदविका प्राप्त करून वेगळा ठसा निर्माण केला आहे.
युवकांपुढे आदर्श
दोन-तीन वर्षांपूर्वी जगन्नाथ पाटील, हरिदास पाटील, शीतल पाटील, अमर पाटील, शीतल पाटील, महादेव पाटील, राहुल पाटील, सुहास कांबळे यांनी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अधिकारीपद पटकावून गावातील युवकांपुढे आदर्श निर्माण केला.