मिरज इतिहास संशोधन मंडळास अमेरिकेच्या विद्यार्थिनीची भेट
By admin | Published: May 22, 2014 12:31 AM2014-05-22T00:31:26+5:302014-05-22T00:42:36+5:30
मराठेशाहीचा अभ्यास : इतिहासाच्या अनास्थेबद्दल खंत
मिरज : महाराष्ट्रातील मराठेशाहीतील चित्र आणि वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौर्यावर आलेल्या अमेरिकेतील येल विद्यापीठातील विद्यार्थिनी होली शाफर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहास भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहातील पेशवेकालीन चित्रपोथ्या व दोलामुद्रितांचा अभ्यास केला. इतिहासाप्रतीची समाजातील अनास्था लक्षात आल्याने इतिहासाचा हा ठेवा योग्यरित्या जतन होत नसल्याची खंत त्यांनी अभ्यासादरम्यान व्यक्त केली. अमेरिकेतील येल विद्यापीठाचा जगातील पाच नामवंत विद्यापीठात समावेश होतो. या विद्यापीठातील विद्यार्थिनी होली शाफर ‘मराठेशाहीतील चित्र व वास्तुकला‘विषयक अभ्यास करीत आहेत. त्यांना या अभ्यासासाठी ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन स्टडीज’ या संस्थेतर्फे शिष्यवृत्ती मिळाली आहे. सांगली व मिरजेतील मराठेकालीन वास्तू व चित्रांच्या अभ्यासासाठी त्यांना मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर यांनी मार्गदर्शन केले. सांगली व कोल्हापूर परिसरातील जुनी मंदिरे, वाडे, संग्रहालये, ऐतिहासिक ठिकाणे यांना त्यांनी भेटी दिल्या. अभ्यासादरम्यान त्यांनी कुमठेकर यांच्या संग्रहातील मराठा काळातील चित्रांकित पोथ्या, पोथ्यातील प्रसंगांना अनुसरून रेखाटलेले चित्रप्रसंग, देवनागरी भाषेत छापण्यात आलेला पहिला ग्रंथ, १८६२ पूर्वी मुद्रित करण्यात आलेली ‘पाळण्यातील पुस्तके’ म्हणजेच दोलामुद्रिते यासह विविध मराठेशाहीकालीन संदर्भांचा अभ्यास केला. मानसिंगराव कुमठेकर, प्रा. गौतम काटकर, संतोष भट, संग्राम मोरे यांनी मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली. भारतात मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र त्याबद्दल समाजात अनास्था आहे. यामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शाफर यांनी खंत व्यक्त करून मंडळाच्या एकूण कार्याचे कौतुक केले. (वार्ताहर) जगातील प्रमुख विद्यापीठांमध्ये मिरजेचे नाव मिरजेतील मीरासाहेब दर्गा, तंतुवाद्ये, संगीत परंपरा यामुळे मिरजेचे नाव जगभरात पोहोचले आहे. आता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून जगातील प्रमुख विद्यापीठातील इतिहासाचे अभ्यासक मिरजेत येत आहेत. मराठेशाहीच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासात विविध संदर्भासाठी हे संशोधक मंडळाच्या संपर्कात आहेत. अमेरिकेसह जपान, फ्रान्स, जर्मनीतील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मंडळास भेटी दिल्या आहेत. मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद व दिल्ली येथील अभ्यासकही येथे येतात.