आर्ट गॅलरीला वारली चित्रकलेचा साज! पर्यटकांना आनंद : चिंचोली येथे चित्रकार अशोक जाधव यांची किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:07 AM2018-02-18T00:07:27+5:302018-02-18T00:08:05+5:30
पुनवत : चिंचोली (ता. शिराळा) येथील चित्र आणि काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी त्यांच्या आर्ट गॅलरीचे बाह्यांग
सहदेव खोत ।
पुनवत : चिंचोली (ता. शिराळा) येथील चित्र आणि काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी त्यांच्या आर्ट गॅलरीचे बाह्यांग आदिवासी वारली चित्रकलेने सजविले आहे. गॅलरीच्या भिंतीवरील वारली जीवनशैलीतील प्रसंगचित्रे पाहून पर्यटक आनंदित होत आहेत.
चिंचोलीसारख्या खेडेगावात चित्रकार जाधव यांनी उभारलेली आर्ट गॅलरी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. जाधव यांनी पिंपळ पानावरील चित्रे, निसर्गचित्रे, रचनाचित्रे, आकर्षक काष्ठशिल्पे, शास्त्रीय, पाश्चिमात्य तसेच लोकनृत्ये यांची माहिती देणारी कात्रणे, जगातील वस्तुसंग्रहालयांची माहिती देणारी कात्रणे, भारतीय व पाश्चिमात्य चित्रकारांचा माहितीपट, सात हजार काड्यापेटींचा संग्रह, गावगाड्यातील जुन्या कालबाह्य झालेल्या वस्तूंचा संग्रह, कलाविषयक पुस्तके असा अनमोल खजिना येथे ठेवला आहे. नैसर्गिक लाकडांपासून कल्पक दृष्टीने बनविलेली काष्ठशिल्पे लक्षवेधी आहेत.
आता गॅलरीच्या वैभवात भर म्हणून जाधव यांनी बाहेरच्या भिंतीवर आदिवासी वारली समाजातील जीवनशैली चित्ररूपाने साकारली आहे. वारली लोक भिंतीवर पांढºया पिठाने साधे व सुबक आकार रंगवतात हे या कलेचे वैशिष्ट्य. जाधव यांनी भिंतीवर वारली समाजातील पाणी भरणाºया स्त्रिया, जात्यावरील दळण, बैलगाडी, पेरणी, पीक कापणी नृत्ये, संध्याकाळचे जेवण, सण, विवाह, वारली समाजाची वाद्ये आदी प्रसंगचित्रे काढली आहेत. ती पर्यटकांना थक्क करणारी आहेत. या चित्रांतून वारली कलेची ओळख कलाप्रेमींना होत आहे .
चित्रांमागचा उद्देश...
चित्रकार अशोक जाधव म्हणाले, वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. हे लोक जरी साधे जीवन जगत असले तरी त्यांची चित्रकला अफलातून आहे. ते निसर्गावर प्रेम करणारे आहेत. त्यांच्या कलेची ग्रामीण भागात ओळख व्हावी व प्रत्येकाने त्यांच्यासारखे निसर्गावर प्रेम करावे. हा या या चित्रांमागला उद्देश आहे.