सांगली : पणुंब्रे-घागरेवाडी शिवारातील ते सात गवे गेले कोठे?, वनविभागाची शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:27 PM2018-02-16T12:27:03+5:302018-02-16T12:41:03+5:30
पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, बुधवारी दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच्यावर हल्ला न करता वन विभागाशी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
कोकरुड : पणुंब्रे-घागरेवाडी शिवारात मंगळवारी दाखल झालेल्या सात गव्यांना शोधण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. मात्र, दिवसभर एकाही गव्याचे दर्शन झाले नाही. या गव्यांनी नेमका कुठे आश्रय घेतला आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गवे दिसल्यास त्यांच्यावर हल्ला न करता वन विभागाशी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास सात गवे जिंती (ता. कऱ्हाड) येथील लोकांनी पिराच्या डोंगरातून पणुंब्रे-घागरेवाडीच्या शिवारात हकलले होते. हे सर्व गवे घागरेवाडीच्या वाडीमागच्या डोंगरात मंगळवारी दुपारी दाखल झाले होते.
या गव्यांकडून पिकांचे नुकसान तसेच मानवी वस्तीवर हल्ले होऊ नयेत या दृष्टीने घागरेवाडी-पणुंब्रे येथील शेतकऱ्यांनी दगडांचा आणि काठ्यांचा वापर करत या गव्यांना हुसकावले होते.
या सात गव्यांपैकी तीन गवे शिरशीच्या दिशेने, तर चात गवे मोंडेवाडीच्या दिशेने गेले होते. बुधवारी शिराळा वनविभागाचे वनरक्षक दादा शेटके, सुदाम जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली.
भीतीचे वातावरण
गवे कळपातून वेगळे झाले आहेत. त्यामुळे ते बिथरले असून, चिड़खोर बनले आहेत. अशावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला न करता तात्काळ वन विभागाशी संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसभर या गव्यांचा तपास न लागल्याने पणुंब्रे, घागरेवाडी, मोंडेवाडी, मुळीकवाडी, गिरजवडे, शिरशी, धामवडे, कोंडाईवाडी व कराड तालुक्यातील जिंती, येणपे, महारुगडेवाडी, बोत्रेवाडी, शेवाळवाडी, चोरमारवाडी गावात भीतीचे वातावरण कायम आहे.