दहा लाखांची मिरची पावडर जप्त
By admin | Published: October 18, 2015 12:20 AM2015-10-18T00:20:24+5:302015-10-18T00:20:24+5:30
कुपवाडमध्ये छापा : मक्याच्या पीठाची भेसळ?
सांगली : कुपवाड एमआयडीसीतील एम. जी. फूड इंडस्ट्रिज या कारखान्यावर अन्न औषध व प्रशासन विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकून मिरची पावडर व मक्याचे पीठ असा दहा लाखांचा साठा जप्त केला. मिरची पावडरमध्ये मक्याचे पीठ भेसळ करीत असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली असल्याचे सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांनी सांगितले.
सांगलीतील महेश मोहन वाठारकर यांची एम. जी. इंडस्ट्रीज फर्म आहे. या ठिकाणी मिरची पावडर तयार केली जाते; पण यामध्ये दहा टक्के मक्याची पावडर भेसळ केली जात असल्याची तक्रार अन्न औषध व प्रशासन विभागात आली होती. त्यामुळे या विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी ए. ए. पवार यांनी शनिवारी दुपारी अचानक भेट देऊन मिरची पावडरची पाहणी केली. त्यावेळी मिरची पावडरमध्ये मक्याचे पीठ भेसळ करीत असताना कामगारांना रंगेहात पकडण्यात आले. कारखान्याची पाहणी केल्यानंतर निर्यातीसाठी तयार केलेल्या मिरची पावडरच्या २५ किलो वजनाच्या ४२२ पिशव्या आढळून आल्या. त्याची किंमत साडेनऊ लाख रुपये आहे. तसेच मक्याच्या ७० किलो वजनाच्या १७ पिशव्या आढळून आल्या. त्याची किंमत १८ हजार रुपये आहे, असा एकूण नऊ लाख ६९ हजारांचा माल जप्त केला आहे. सायंकाळी सहापर्यंत ही कारवाई सुरू होती. मिरची पावडर पॅकिंगच्या पिशवीवर मे. एम. जी. फूड इंडस्ट्रिज या फर्मचा उल्लेख न करता बंटी फूडस्टफ, शारजाह, युएइ असा आखाती देशातील फर्मचा उल्लेख आहे. मिरची पावडरची विक्री आखाती देशातील ए-वन स्यूक स्पायसेस पॅकेजिंग अॅण्ड ए-वन मसूर ट्रेडिंग, शारजाह यांना विकत असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे कोळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नमुने पाठविणार
कोळी म्हणाले की, एमजी इंडस्ट्रीजचे मिरची पावडरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना व्यवसायासाठी केंद्र सरकारचा परवाना घ्यावा लागतो. त्यांनी परवान्यासाठी अर्ज केला आहे. पण अद्याप त्यास मंजुरी मिळाली नाही. तरीही त्यांनी उत्पादन सुरू केले होते. जप्त केलेल्या मिरची पावडरचे नमुने तपासणीसाठी सोमवारी पाठविले जाणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.