अंत्ययात्रा सुरू असताना पूल कोसळला, मृतदेहासह 25 जण नदीत कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 02:21 PM2018-12-30T14:21:02+5:302018-12-30T18:04:40+5:30
अंत्ययात्रा सुरू असताना पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मृतदेहासह 25 जण नदीत कोसळले आहेत.
सातारा : साताऱ्यामध्ये अंत्ययात्रा सुरू असताना पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मृतदेहासह 25 जण नदीत कोसळले आहेत. साताऱ्यातील खरोशी गावात रविवारी (30 डिसेंबर) ही घटना घडली. अनेक जण जखमी झाले असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरोशी येथील कृष्णाबाई चांगू कदम (90) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. नातेवाईक आल्यानंतर रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अंत्यविधीची तयारी करण्यात आली. गावापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी लोखंडी पूल आहे. या पूलावरूनच गावकरी नेहमी ये जा करतात. रविवारी सकाळी साडेदहा वाजता अंत्यविधीला सुरुवात झाली. मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानभूमीत जात असताना सर्वजण लोखंडी पुलावर आले. मधोमध पोहोचल्यानंतर अचानक पूल कोसळला. त्यामुळे खांदेकरी मृतदेहासह सुमारे २५ फूट खाली ओढ्यात पडले. तसेच काही ग्रामस्थही पडले.
नेमके काय करावे, हे कोणालाही सूचेनासे झाले होते. तर ओढ्यामध्ये पाणी नसल्यामुळे दगड गोटे आहेत. या दगड गोट्यावरच अनेकजण आदळले. अंत्यविधीला पाठीमागून येणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ओढ्यात उतरून जखमींना बाहेर काढले. जखमींना मिळेल त्या वाहनाने तळीये येथे नेण्यात आले. कोसळलेला पूल सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पूल कोसळल्यानंतर मृतदेह ओढ्यातून पुन्हा खांद्यावर घेण्यात आला व अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावकऱ्यांनीही अंत्यविधी उरकला
खरोशी गावातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली होती. त्यातच पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. हे दु:ख बाजूला सारून गावकऱ्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
सातारा : अंत्ययात्रा सुरू असताना पूल कोसळला, मृतदेहासह 25 जण नदीत कोसळले, खरोशी गावातील घटना, 8 जण गंभीर जखमी #Satara
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 30, 2018