'राजां'ची झाली 'युती'; शिवेंद्रराजे बनले उदयनराजे, पवारांच्या गाडीचे सारथी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 02:32 PM2019-01-26T14:32:38+5:302019-01-26T15:33:19+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
सातारा - खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात दुरावा निर्माण झाल्याचे पहावयास मिळत होते. खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. मात्र, आज एका खासगी कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले असता त्यांनी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांना एकाच गाडीमध्ये घेत घेतले. विशेष म्हणजे यावेळी चक्क शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या गाडीचे सारथ्य केल्याचे सातारकरांनी पाहिले.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. नगरापालिका निवडणुकांवेळी घटस्फोट घेतलेल्या साताऱ्यातील दोन्ही राजांचे पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचे दिसून आले. या मनोमिलनाचे निमित्त ठरले, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार. एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यावेळी, राजघराण्यातील दोन्ही राजांची युती करण्याचे काम पवारांनी केली. कारण, यावेळी चक्क उदयनराजे अन् शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केल्याचे सर्वांनी पाहिले. या दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनाच्या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, पवारांच्या गाडीतून उदयनराजेंची एंट्री झाल्यामुळे उदयनराजे हे राष्ट्रवादीसोबतच असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रवासावरुन खासदार उदयनराजे हे राष्ट्रवादीसोबतच आहेत, त्यांना दुसऱ्या गाडीत बसू देणार नाही, असेच पवारांनी महाराष्ट्राला सुचित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून साता-याची जागा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना मिळणार किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत पक्षातील आमदारांचाच विरोध होता. मात्र, शरद पवार यांनी आज एका कार्यक्रमासाठी आले असता खासदार उदयनराजे, सातारा–जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना आपल्या गाडीत घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच उदयनराजेंना उमेदवारी मिळण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत.
व्हिडीओ -