डोंगर बनला काळ, मोडून पडला संसार!; पाटण तालुक्यातील भूस्खलनाच्या भयानक आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:06 PM2022-07-22T12:06:52+5:302022-07-22T12:08:00+5:30
निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पाटण तालुक्यातील सुमारे ४२ गावांवर गतवर्षी २२ जुलै रोजी काळाने घाला घातला. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन अनेकांचे संसार अकराळविकराळ डोंगराखाली गाडले गेले.
नीलेश साळुंखे
कोयनानगर : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पाटण तालुक्यातील सुमारे ४२ गावांवर गतवर्षी २२ जुलै रोजी काळाने घाला घातला. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन अनेकांचे संसार अकराळविकराळ डोंगराखाली गाडले गेले. आंबेघर, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी या गावांतील अनेकांचा या ढिगाऱ्याखाली बळी गेला. तर अनेकांचे घरदार, शेती भुईसपाट झाली. या घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले; पण तेथील भूस्खलनाच्या भयानक आठवणी आजही ग्रामस्थांच्या अंगावर शहारा आणतात.
गतवर्षी २२ जुलै रोजी म्हणजेच मराठी महिन्यातील आषाढातील बेंदराच्या सणाला पाटण तालुक्यात हाहाकार उडाला होता. क्षणात होत्याचे नव्हते झाले. निसर्गाने विपरीत घडवले. जुलै महिन्यातील दमदार पावसाने भात लावणीच्या कामाला नुकताच वेग आला होता. ज्याच्या जीवावर आपला संसाराचा गाडा चालतो, त्या शिवाराच्या अन् गुराढोऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एक दिवस असतो, तो म्हणजे बेंदूर. गतवर्षी या सणादिवशी २२ जुलै रोजी पाटण तालुक्यातील शेतकरी आनंदात होते. शेतकऱ्यांनी दिवसभर गुराढोरांची सेवा केली. अंघोळ घालून तसेच विविध रंगांनी शिंगे रंगवून त्यांनी जनावरांना सजवले. दिवसभर शेत शिवाराला नैवेद्य दाखवला.
ऐन पावसात बेंदराची पूजा आटोपून रात्री नऊ-साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोळी अन् आमटी ताटात घेऊन शेतकरी तोंडात घास घालणार एवढ्यात गोठ्यातील जनावरांनी हंबरायला सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी नुकतेच अंथरुणावर अंग टाकलेले तर काही जण जेवायला बसलेले. हातातला घास ताटात ठेवूनच ते बाहेर धावले. मात्र, तोपर्यंत काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या डोंगरामध्ये शेतकऱ्यांनी आयुष्य घालवले तोच डोंगर त्यांच्यासाठी काळ बनून आला.
बेंदराचा सण मुळावर उठला!
कुणाला काही समजण्यापूर्वीच निद्रावस्थेत असलेल्या भूमिपुत्राला अन् मायेच्या कुशीत डोळे मिटलेल्या लेकरांना या डोंगराने गिळंकृत केले. दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली त्यांना गाडून टाकले. बेंदूर म्हणजे मुळाचा सण; पण गतवर्षीचा बेंदूर पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला असे म्हणावे लागेल.
भूस्खलनात झालेले मृत्यू
आंबेघर : १४
ढोकावळे : ६
मिरगाव : ११
हुंबरळी : ०१
बोंद्री : ०१
जळव : ०१
येराड : ०१
मंद्रुळकोळे : ०१