एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 09:46 PM2018-05-28T21:46:47+5:302018-05-28T21:46:47+5:30

गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून

Bongorwadi Tumumba in one rain! Well-filled wells: The pain of the water cup competition | एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला

एकाच पावसात बनगरवाडी तुडुंब ! वळवाने विहिरी भरल्या : वॉटर कप स्पर्धेतील कष्ट फळाला

Next

नितीन काळेल
सातारा : गावाची एकी, तरुणांचा सहभाग असलेतर अशक्य गोष्टही शक्य होऊन जाते, ते दाखवून दिले आहे दुष्काळी बनगरवाडी गावाने. प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गावातील विहिरी वळवाच्या पहिल्याच पावसाने तुडुंब भरून गेल्या आहेत. शेततळे भरले आहे. विशेष म्हणजे पावसामुळे उन्हाळ्यातही ओढ्याला पाणी वाहत असून, जनावरांना पाणी उपलब्ध झाले आहे.

माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) गाव दुष्काळी. तसे पाहिलं तर गाव माळरानावर वसलेलं. येथील शेती पूर्णपणे पावसाच्या भरवशावर. ज्यावर्षी चांगला पाऊस पडेल तेव्हा खरीप व रब्बी हंगाम घेता यायचा; पण उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती व्हायची. लोकांना टँकरने पाणी मिळायचं; पण येथील मेंढपाळांना पाण्यासाठी दूरदूरवर जायला लागायचं. असं असताना गेल्या दोन-तीन वर्षांपासून येथील चित्र बदलू लागलं आहे. ग्रामस्थांची एकी आणि तरुणांचा सहभाग वाढल्यामुळे जलसंधारणाची कामं होऊ लागली आहेत. गेल्यावर्षी एका जुन्या पाझर तलावाची व बंधाऱ्याची दुरुस्ती झाली. त्यामुळे पाणीपातळी वाढल्याने लोकांना जलसंधारणाचं महत्त्व समजलं. त्यातूनच यावर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग घेतला.

गावचे सुपुत्र व आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव स्पर्धेत उतरलं. त्यानंतर सरपंच रंजना बनगर, उपसरपंच सागर बनगर, पाण्यासाठी सुरुवातीपासून तळमळीने पुढे येऊन काम करणारे ग्रामपंचायत सदस्य विक्रम शिंगाडे यांनी वॉटर कप स्पर्धेचं काम हाती घेतलं. लोकांमध्ये जागृती केली. त्यामुळे सलग ४५ दिवस दररोज ३५० ते ४०० ग्रामस्थ श्रमदान करीत होते. उन्हातान्हाची पर्वा न करता त्यांचे हे काम सुरू होतं. त्यामुळेच स्पर्धेतील उद्दिष्टापेक्षा अधिक काम झालं आहे. याचा फायदाही आता दिसून आला आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वळवाचा पहिला पाऊस बनगरवाडी परिसरात झाला. ओढ्यानं वाहून जाणारं पाणी जागोजागी अडविल्याने विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे वरूनही हातानं पाणी घेता येईल, अशी स्थिती आहे. शेततळ्यात हजारो लिटरचा पाणीसाठा झाला आहे. ओढ्याला पाणी वाहत असल्याने मेंढपाळांना पाणी उपलब्ध झालं आहे. पहिल्याच वॉटर कप स्पर्धेतील या यशाने गावाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे गावानं आता यापुढेही जलसंधारणाचं काम सुरूच ठेवण्याचा निश्चय केला आहे.

दुष्काळी माण तालुक्यातील बनगरवाडीत यंदा झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पहिल्याच पावसात विहिरी तुडुंब भरल्या.

 

Web Title: Bongorwadi Tumumba in one rain! Well-filled wells: The pain of the water cup competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.