वसना नदीवरील पूल मृत्युचा सापळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:41 PM2017-10-03T16:41:33+5:302017-10-03T16:44:45+5:30
सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पिंपोडे खुर्द येथील वसना नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाचे सरंक्षण कठडे तुटल्यामुळे मागील काही दिवसांत दोन वाहनांना जलसमाधी मिळाली तर या अपघातात एकजण ठार झाल्याची नोंद आहे.
वाठार स्टेशन, दि. ३ : सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पिंपोडे खुर्द येथील वसना नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाचे सरंक्षण कठडे तुटल्यामुळे मागील काही दिवसांत दोन वाहनांना जलसमाधी मिळाली तर या अपघातात एकजण ठार झाल्याची नोंद आहे. दोन दिवसांपूर्वी तर औरंगाबादहून सातारला जाणारी कार याच पुलावरुन नदीपत्रात पडल्याने जवळपास सहाजण गंभीररित्या जखमी झाले होते.
पिंपोडे खुर्द गावाशेजारील वसना नदीवर ब्रिटीशकालीन पूल आहे. हा पूल खड्ड्यांमुळे धोकादायक झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी या पुलावरील खड्डा चुकवताना एक ट्रक नदीपात्रत कोसळला होता. यात एक जण जागीच ठार झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाल्याची नोंद वाठार पोलिस ठाण्यात आहे. तसेच सरंक्षण कठडे तुटल्यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरुन वाहने नदीपात्रात कोसळत आहेत.
वहानधारकांसाठी मृत्युचा सापळा बनलेल्या या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाकडी बांबुचा सरंक्षण कठडा केला आहे. मात्र, अशा प्रकारच्या तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा या पुलावरील वाहतुकीची स्थिती पाहून कायमस्वरुपी सरंक्षक कठडा बांधावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
वसना नदीवरील या पुलाचा खालील भाग खचल्यासारखा दिसत आहे. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचं असून वाहनांची वर्दळ लक्षात घेता या पुलाच्याकडेला मजबूत संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. यासाठी बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.