Budget 2018 : सरकारचा खिसा फाटका, बाता मात्र हजारो कोटींच्या - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 12:52 PM2018-02-01T12:52:25+5:302018-02-01T12:56:35+5:30
देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणा-या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय - राज ठाकरे
सातारा - ‘देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती आणणा-या मोदी सरकारचा खिसा पूर्णपणे फाटका बनलाय, मात्र त्यांच्या बाता हजारो कोटींच्या भाषेत सुरू झाल्यात. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे,’ असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साता-यात व्यक्त केला.
राज ठाकरे पुढे असंही म्हणाले की, ‘ऊठ सूठ गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का? आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्वास नाही.’
‘पश्चिम महाराष्ट्राची क्षमता तशी खूप आहे. मात्र याची जाणीव पश्चिम महाराष्ट्रालाच नाही. वर्षानुवर्षे त्याच त्या बाता मारून जनतेला अंधारात ठेवण्याचे काम आजपर्यंतच्या नेत्यांनी केले आहे. म्हणूनच प्रत्येक वेळी मी कळवळून सांगत असतो की, एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मला सत्ता देऊन बघा. मात्र विकासावर निवडणुका जिंकता येत नाहीत, असे वाटू लागले आहे. नाशिकमध्ये मला हा अनुभव आला आहे.’
‘मी सत्य बोलतो. त्याचे परिणाम भोगण्यास मी तयार असतो. मात्र, मी जे बोलतो ते काही वर्षांनंतर तसेच घडते, तेव्हा माझ्या बोलण्याचे महत्त्व जनतेला कळते. २०१५ सालीच मी गौप्यस्फोट केला होता की, पुढच्या काही वर्षांत सतत जातीय दंगली घडविल्या जातील. माझ्या त्या वेळच्या बोलण्याची सत्यता आता लोकांना कळू लागली आहे,’ असेही राज ठाकरे यांनी शेवटी बोलताना सांगितले.