कॅलिफोर्नियातील ‘सौख्या’च्या गायनाने गोंदवलेकर भारावले
By admin | Published: December 21, 2016 11:48 PM2016-12-21T23:48:17+5:302016-12-21T23:48:17+5:30
शास्त्रीय गायनाची मैफल : बंदीश, भावगीतांनी मिळविली दाद
दहिवडी : मूळची कोल्हापूरची आणि सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्थायिक असलेल्या अवघ्या १८ वर्षांच्या सौख्या इनामदारने ब्रह्मचैतन्य महाराजांवर असलेली आपली निष्ठा शास्त्रीय गायनाच्या माध्यमातून अधोरेखित केली. तिने केलेल्या गायनाने गोंदवलेकर मंत्रमुग्ध झाले.
ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उत्सवानिमित्ताने दररोज गायन, प्रवचन, भजन, कीर्तन हे कार्यक्रम होत असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक श्रोते या ठिकाणी आले आहेत. अनेकजण महाराजांच्या प्रती आपली सेवा अर्पण करीत आहेत. सौख्या इमामदार ही सध्या कॅलिफोर्नियात स्थायिक असली तरी तिने ब्रह्मचैतन्य महाराजांवर असलेली निष्ठा गायनातून अधोरेखित केली. तिने थेट कॅलिफोर्नियातून शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करून गोंदवलेकरांची मने जिंकली.
या मैफलीत शुद्ध सारंग राग, मिया मल्हार, मिश्र निलंग बंदिशा सोबत एकताल सादर केला. ‘युवती मना’ हे संगीत मानापनामधील नाट्यगीत ‘मी राधिका मी प्रेमिका’ आणि ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ अशी कठीण भावगीते सौख्याने सादर केली. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘देस रागावर मन मंदिरा तेजाने’ या गीताने श्रोत्यांनी तिला डोक्यावर घेतले. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावगीतांनी रंगलेली मैफल ‘कसा मला टाकूनी गेला राम, अरे अरे ज्ञाना’ या गीतांनी मैफलीत रंगत आणली.
लहानपणापासून आईकडून मिळालेले धडे गिरवीत आज सौख्याने गोंदवलेतील श्रोत्यांना मंत्रमुग्ध
केले. श्रीधर फडके यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभल्याने अनेक पारितोषिके तिने जिंकली आहेत. सौख्याला मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियम, शिरीष जोशी तबला, जयंत ओक यांनी टाळ वाजवून साथ दिली. (प्रतिनिधी)
आईकडून घेतले धडे
स्वर सौख्याचे स्वप्न साऱ्यांचे’ ही मैफल सादर करून सौख्याने आपण कॅलिफोर्नियात असलो तरी आजही मराठी मातीवर तितकेच प्रेम करतो हे दाखवून दिले आहे.
सौख्याने आई रेणुका इनामदार यांच्यासह मनोज ताम्हणकर व अर्चना ताम्हणकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. तीने सुरेख गाणी सादर करून गोंदवलेकरांची वाहवा मिळवली.