फूटपाथवरच्या गर्दीत भरधाव कार घुसली!

By admin | Published: August 4, 2015 11:18 PM2015-08-04T23:18:16+5:302015-08-04T23:18:16+5:30

हिट अँड ‘फन’ : भर मोती चौकात तिघांना जखमी करणाऱ्या अपघाताचा पाऊण तास ‘इव्हेन्ट’

Carriage rush in the crowd! | फूटपाथवरच्या गर्दीत भरधाव कार घुसली!

फूटपाथवरच्या गर्दीत भरधाव कार घुसली!

Next

सातारा : मोती चौक. साताऱ्याच्या गळ्यातला मोती. गजबजलेली दुपार. दुकानांत आणि फूटपाथवरही विक्रेते, ग्राहक नेहमीच्या बिनधास्त, निवांत मूडमध्ये. अशा वेळी एक कार भरधाव वेगात रस्ता सोडून थेट फूटपाथवर चढते आणि हलकल्लोळ उडतो. जखमी झालेल्या तिघांची पाठवणी रुग्णालयात झाल्यानंतर मात्र पाऊण तासाचा ‘इव्हेन्ट’ रंगतो...
‘साताऱ्याचा सलमान’ (ही उपस्थितांनीच दिलेली उपाधी बरं!) अजून गाडीतच बसून राहिलेला. दार उघडून बाहेर येण्याची हिंमत कुठे होतेय? गाडीभोवती गर्दी जमलीय. कुणी भेदरलेल्या जखमींना हात देतोय तर कुणी गाडीत डोकावून पाहतोय. फूटपाथजवळ असलेल्या फळविक्रेत्या वृद्धाला धक्का देऊन गाडी फूटपाथवर चढली. तिथं आणखी दोन महिलांना धक्का दिला. तिघांच्याही जखमा फारशा गंभीर नसल्या, तरी अचानक समोर आलेली गाडी बघून हृदय बंद पडायचंच बाकी राहिलेलं! ‘हो... हो’ म्हणेपर्यंत धक्का!
चुन्याची पाटी आणि पोपटी रंगाच्या लहानमोठ्या डब्या विकायला नेहमी त्याच ठिकाणी बसणारी महिला तर धक्क्यानंतरही तशीच बसून राहिलेली. तिच्यापासून केवळ एका फुटावर गाडी थांबली होती, नाहीतर..! तिला ओरडता येईना. तोंडून शब्द फुटेना, अशी अवस्था. जखमींना फारसा मार लागलेला नाही, हे लक्षात आल्यावर तिघांना रिक्षातून रुग्णालयात पाठवलं गेलं आणि मग या विचित्र अपघाताच्या कारणांचा शोध सुरू झाला. गाडी कुठून आली, फूटपाथवर कशी चढली, ड्रायव्हर नवीन आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या. पोलिसांना निरोप गेला. ड्रायव्हर मात्र अजून गाडीतच!
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा वेगवेगळ्या गावांमध्ये रवाना झाल्यामुळं चौकात पोलीस यायला बराच वेळ लागला. तोपर्यंत चौकात अपघाताचा ‘इव्हेन्ट’ होत गेला. दुकानाच्या फळीला जाऊन टेकलेल्या गाडीखाली आणखी कुणी (किंवा आणखी काही) आहे का, हे काही जणांनी तपासून पाहिलं. मग मात्र अँड्रॉइड फोन बाहेर आले. वेगवेगळ्या अँगलमधून अपघातग्रस्त गाडीचा ‘फोटोसेशन’ सुरू झाला. बघ्यांच्या गर्दीतून मोबाइल कॅमेऱ्यांचे ‘ची-ची’ आवाज येऊ लागले.
‘अपघात’ या गोष्टीविषयी लहान मुलांना असलेलं कुतूहल शमवण्याचा प्रयत्नही काही पित्यांनी केला. लहानग्यांनीही अपघातग्रस्त गाडी ‘जवळून’ पाहून घेतली.
सुमारे अर्ध्या तासानं पोलिसांच्या उपस्थितीत ड्रायव्हर गाडीबाहेर आला. भालचंद्र केशव मुळे (रा. समर्थ मंदिर, सातारा) असं त्याचं नाव असल्याचं समजलं. पण गाडी त्याची नव्हतीच. गाडीमालकाचं नाव मोहन हणमंते असल्याचा साक्षात्कारही उपस्थितांना झाला. त्याचप्रमाणं तीन जखमींपैकी एकीचं नाव भाग्यश्री पांडुरंग कोकरे असं आहे, याचाही उलगडा झाला. पोलिसांनी मग चालकाला घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात नेलं आणि क्रेन बोलावून गाडी फूटपाथवरून हलवली.
मोती चौक हा साताऱ्याचा केंद्रबिंदू मानला जातो. या चौकात नेहमी वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी असते. फूटपाथवर अनेक विक्रेते वर्षांनुवर्षे व्यवसाय करीत आहेत. पानवाले, चुनावाले आणि अधून-मधून येणारे भाजी व फळविक्रेते मोती चौकातच असतात. अशा ठिकाणी घडलेला हा अपघात नुकसानकारक ठरला नसला तरी धक्कादायक मात्र ठरला.(प्रतिनिधी)


दूरदूरचे ‘प्रेक्षक’ हजर!
सातारा कितीही विस्तारला तरी मोती चौकाचं महत्त्व अढळ राहिलंय. अशा चौकात चक्क गाडी फूटपाथवर चढली, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोवई नाक्यावरूनही काही जणांनी मोती चौकाकडे धाव घेतली. आजूबाजूच्या गल्ली-बोळांमधून तर ‘प्रेक्षक’ आलेच; पण दूरदूरचे बघेही पोलिसांच्या आधी चौकात हजर!

Web Title: Carriage rush in the crowd!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.