दिसली गाडी की उचलते क्रेन !
By admin | Published: April 25, 2017 10:42 PM2017-04-25T22:42:45+5:302017-04-25T22:42:45+5:30
साताऱ्यात पार्किंगची दयनीय अवस्था : वाहने लावण्यास जागा नसल्याने सातारकर झालेत हतबल
सातारा : शहरातील पार्किंग व्यवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यावर वाहने लावण्यास कुठेही जागा मिळेनासी झाली आहे. दाटीवाटीमध्ये वाहने लावल्यानंतर वाहनाचा शेपूट जर रस्त्यात दिसला तर क्रेनची गाडी पटकण वाहने उचलत आहे. त्यामुळे पार्किंगची सुविधा पालिकेने तातडीने करणे गरजेचे आहे.
फलटण पालिकेने नो-पार्किंगचे बोर्ड आणि रस्त्यावर पट्टे ओढण्यासाठी काही दिवस क्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इकडे साताऱ्यामध्ये या सगळ्या सुविधा असताना वाहने लावण्यास मात्र जागा शिल्लक राहिली नाही. सम-विषम तारखेला दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत. मात्र, रस्ते छोटे झाल्याने रस्त्याच्या कडेला वाहन लावणे अवघड झाले आहे.
शेटे चौकातील गुरूअलंकार इमारतीपासून पोवई नाक्यापर्यंत हीच परिस्थिती आहे. तसेच राजवाडा आणि राजपथावरही रस्त्यावर वाहने लावताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकजण आर्थिक भुर्दंड नको म्हणून पार्किंगच्या नियमाचे काटेकोर पालन करत असतात. मात्र, नेमक्या अशाच लोकांना रस्त्यावर गाडी लावण्यास जागाही मिळत नाही. नियम मोडणारे वाहनचालक मात्र बिनधास्त रस्त्याच्याकडेला कशीही गाडी उभी करून जात असतात. एकाच्या चुकीमुळे दुसऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.
बसस्थानकात तर याहून स्थिती वेगळी नाही. स्थानकापुढे ‘पे अँड पार्क’ची सुविधा असली तरी अनेकजण रस्त्याच्याकडेलाच गाडी लावतात. बाहेरगावी जाणारे लोक ‘पे अँड पार्क’मध्ये गाडी लावत असतात. या ठिकाणी वाहन लावण्यासाठी आता जागाच उरलेली नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरात क्रेनला सात ते आठ गाड्या एका ट्रीपला सापडत असतात. पोवई नाक्यावर तर वाहन पार्किंगला जागाच नाही. त्यामुळे कोरेगाव रस्ता किंवा बसस्थानक रस्त्यावर वाहने लावून परत पोवई नाक्यावर चालत यावे लागते. सगळ्यात जास्त पार्किंगची भीषण परिस्थिती देवी चौक ते मोती चौकया ठिकाणी शाळा, क्लासेस आणि मुख्य बाजार पेठ असल्यामुळे नेहमी रहदारी असते. नेमक्या याच ठिकाणी वाहने लावण्यास जागा मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. (प्रतिनिधी)
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड
मोती चौकात कामानिमित्त गेल्यानंतर गाडी लावण्यास जागाच मिळत नाही. पालिकेने या परिसरात पार्किंगची सोय करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना पोलिसांकडून विनाकरण आर्थिक भुर्दंड बसत आहे.
- राम माने, सातारा