जुन्या वायरिंगमुळं पेटतायत गाड्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:18 PM2018-02-11T23:18:05+5:302018-02-11T23:18:12+5:30
सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.
बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत आहे. घरात जेवढी माणसं तेवढीच दुचाकी वाहनं अन् एखादी कार येत आहे. आधुनिक काळात ही काळाची गरजही आहे; पण प्रत्येकजण नोकरी व्यावसायात गुंतून गेला असल्याने त्याला वाहनांची देखभाल करायला वेळच मिळत नाही. त्यातून तो एक-एक दिवस पुढे ढकलतो अन् अपघातांना सामोरे जावे लागते.
सातारा जिल्ह्यासाठी वाहनांनी पेट घेणे नवीन नाही. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांनी पेट घेण्याच्या घटना वारंवार घडतात. खंबाटकी घाट, पसरणी घाटातही यापूर्वी अनेकदा वाहनांनी पेट घेतले आहेत. कारने पेट घेतल्यानंतर रस्ता अन् वाहनाचे इंजिन यांच्यातील अंतर कमी असल्याने, तसेच रस्ता तापलेला असतो अशी कारणे दिली जातात; पण या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी रस्ता तापल्याने गाडी पेटतात, हे मानायला फारसे तयार नाही.
फलटण शहरात गेल्या महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणाºया बसनेही पेट घेतला होता. गाडीतून येत असलेला धूर चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने मुलांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर पूर्ण वाहन जळून खाक झाले. चालकाच्या वेळीच निदर्शना आले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.
अत्याधुनिक सुविधा; पण धोकाही तेवढाच
वाहनांच्या तंत्रज्ञानात कमालीचा बदल होत आहे. वाहनांचा वेग वाढावा, प्रदूषण कमीत कमी व्हावे म्हणून नवीन वाहनांमध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जातात. टर्बो चार्जर आले आहेत. सरासरी ८० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्ण हवा घेतली जाते. त्याचवेळी गळती लागल्याने पेट घेण्याच्या घटना घडतात.
नियमित देखभाल हाच पर्याय
प्रवासी वाहतूक करणारे वाहन असो व मालवाहू. प्रत्येकाची नियमित काळजी, देखभाल करणे हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये डिझेल, आॅईलची गळती रोखणे, वायरिंगला कोटिंग करणे, शक्य असल्यास त्यावर पुन्हा पॅकिंग केल्यास वायरमुळे अपघात घडण्याचे प्रमाण कमी होईल.