चिकन गुनिया सदृश साथीचे फलटणला अकरा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:11 PM2017-10-09T14:11:50+5:302017-10-09T14:17:51+5:30
चिकन गुनिया सदृश साथीच्या आजाराने त्रस्त असलेले अकरा रुग्ण फलटण शहरात आढळले. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना पत्राद्वारे केल्या आहेत.
फलटण : चिकन गुनिया सदृश साथीच्या आजाराने त्रस्त असलेले अकरा रुग्ण फलटण शहरात आढळले. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना पत्राद्वारे केल्या आहेत.
शहराच्या अन्य भागातही चिकन गुनिया व तत्सम आजाराचे संशयित रुग्ण आढळले. फलटण शहरासह तालुक्यात महिन्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. यावर्षी तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे पाणी साठून राहणे, गटारी, नाले तुंबून राहतात.
शहरातील पाणी पुरवठ्याच्या मुख्य वितरण नलिका बदलण्यात आल्या असल्या तरी छोट्या जलवाहिन्या अनेक वर्षांच्या असल्याने शहराच्या अनेक भागांत त्या गंजलेल्या, फुटलेल्या आहेत. त्यामधून गटारातील किंवा अन्य ठिकाणी साठलेले पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने एकीकडे वातावरण दुषित, दुसरीकडे डासांचे साम्राज्य आणि तिसरीकडे अस्वच्छ पाणी पुरवठा यामुळे यासारखे आजार पसरत असल्याचे सांगितले जाते. राज्य शासनाचा आरोग्य विभाग आणि नगर परिषदेने ठोस भूमिका घेऊन कार्यवाही करण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे.
याबाबत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पत्राद्वारे या गंभीर बाबीची माहिती मुख्याधिकाºयांना दिली आहे. तसेच कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत सूचित केल्या. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाºयांनी शहरातील सर्व प्रभागात नगर परिषद कर्मचाºयांची नेमणूक करून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तुंबलेली गटारे वाहती करणे, शहरातील छोटे खड्डे बुजविणे, जंतूनाशकांची फवारणी करणे आदी कामे हाती घेण्यात येत आहे.
जनतेत जाऊन जनजागृती
घरोघरी जाऊन पाणी साठवण टाक्यांमध्ये डासांच्या आळ्या व अंडी नष्ट करणारी औषधे टाकणे, पाण्याचा साठा न करण्याबाबत तसेच पाणीसाठा करण्यात येणारी भांडी, हौद आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून रिकामा ठेवण्याबाबत, तसेच निरुपयोगी साहित्य, टायर, भंगार व फुटक्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याबाबत नागरिकांना सूचना करण्यात येत असल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले.
कागदी घोडे न नाचविण्याची मागणी
चिकन गुनिया सदृश आजाराबाबत आरोग्य विभाग व पालिकेने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष रुग्ण कोणत्या भागात किती आहेत? ते कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहेत? त्यांची सध्यस्थितीची माहिती देऊन नागरिकांना अधिक सजग करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.