चारशे महिलांच्या उपस्थितीत गायीचे डोहाळे जेवण
By admin | Published: March 9, 2017 05:13 PM2017-03-09T17:13:35+5:302017-03-09T17:14:36+5:30
शेवाळेवाडी-म्हासोलीतील शेतकऱ्याचा अनोखा प्रकार
चारशे महिलांच्या उपस्थितीत गायीचे डोहाळे जेवण
शेवाळेवाडी-म्हासोलीतील शेतकऱ्याचा अनोखा प्रकार
आॅनलाईन लोकमत
उंडाळे : शेवाळेवाडी-म्हासोली, ता. कऱ्हाड येथील प्रगतशील शेतकरी भागवत शेवाळे यांनी आपल्या देशी गाय (गंंगा) हिचे डोहाळे जेवण घातले. यावेळी गावातील महिलांनी गायीची ओटी भरली. विशेष म्हणजे गायीच्या डोहाळे जेवणासाठी गावातील चारशे महिलांनी उपस्थिती लावली.
शेवाळेवाडी-म्हासोली येथील भागवत शेवाळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करीत असलेल्या गायीचे डोहाळे जेवण घालत प्राणीमात्रावर दया करा, त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक द्या, अशी शिकवण दिली आहे. भागवत शेवाळे हे वारकरी सांप्रदायाचे अनुयायी आहेत. ते आपल्या गावाबरोबरच इतर गावांत देखील पारायण मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत.
भागवत शेवाळे यांच्याबरोबर वडील नामदेव त्यांचे आजोबा बंडू बुवा या सर्वांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी आपले आयुष्य खर्ची घालवले आहे. सध्या त्यांची चौथी पिढी या क्षेत्रात उतरली आहे.
गायीचे डोहाळे जेवण घालण्याचा भागवत शेवाळे यांनी निर्णय घेत संपूर्ण गावाला डोहाळे जेवणासाठी आमंत्रित केले आहे. आणि या गायीच्या डोहाळे जेवणासाठी गावासह परिसरातील तब्बल चारशेहून अधिक महिलांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी डोहाळे जेवणासाठी महिलांनी खणानारळांनी गायीचे ओटीभरणही केले. तसेच विधिवत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. (वार्ताहर)
महिलांनी भरली गंगाची खणानारळाने ओटी
यापूर्वी ग्रामीण भागात फक्त महिलांचाच ओटीभरण कार्यक्रम होत असे. गायीचा ओटीभरण कार्यक्रम नाही. मात्र, शेवाळेवाडी-म्हासोलीतील शेतकऱ्याने गंगा गायीचा ओटीभरण कार्यक्रम घेत महिलांना आमंत्रित केले. आणि यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गंगाची खणानारळाने ओटी भरली.
शेवाळेवाडी- म्हासोली येथील शेतकरी भागवत शेवाळे यांनी आपल्या गंगा गायीचे डोहाळे जेवण घातले. यावेळी महिलांनी गायीचे पूजन केले. (छाया : ज्ञानेश्वर शेवाळे)